नवी दिल्ली , 28 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे (omicron) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट रोखण्यासाठी लहान मुलांना सुद्धा लसीकरणासाठी (Vaccinated) सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे कोरोनावरील लसीच्या बूस्टर डोसबाबत ( booster dose ) म्हणजे तिसऱ्या डोसवर सध्या चर्चा सुरू आहे. 10 जानेवारी 2022 पासून 60 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. देशातील काही विशेष श्रेणीतील लोकांना हा तिसरा डोस दिला जाणार आहे. या श्रेणीत असणाऱ्या व्यक्तींना बूस्टर डोस केव्हा मिळणार, याबाबत एक एसएमएस पाठवला जाणार आहे. नवभारत टाइम्स याबाबत वृत्त दिलं आहे.
जगातील अनेक देशांमध्ये बूस्टर डोस सुरू झाला आहे. नवीन वर्षात हा 'प्रिकॉशन डोस' देशातील विशेष श्रेणीतील लोकांना दिला जाईल. सरकारच्या गाईडलाईन्सनुसार या श्रेणीमध्ये हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांनी ग्रस्त 60 वर्षांवरील लोकांचा समावेश असेल. जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक या श्रेणीत येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिसरा डोस कोणत्या दिवशी दिला जाईल, हे कसे समजेल? याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
तिसरा डोस कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतरच दिला जाईल. यासाठी CoWin वर नोंदणी आवश्यक आहे. याबाबत कोविन वेबसाइटचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले, 'लसीचे दोन डोस घेतलेल्या हेल्थकेअर वर्कर्स आणि गंभीर आजार (comorbidity) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोससाठी नोंदणी करण्यासाठी मोबाइलवर एसएमएस मिळेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांची कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी आहे. त्यांनी दुसरा डोस कधी घेतला, हेदेखील त्यामध्ये आहे. दुसरा डोस घेण्याच्या तारखेला 9 महिने पूर्ण होताच, कोविन अॅप एक एसएमएस ज्येष्ठ नागरिकांना पाठवेल. त्यानंतर गंभीर आजार असलेले ज्येष्ठ नागरिक हे 'प्रिकॉशन डोस' घेऊ शकतात.एसएमएस आल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याच्या मोबाइल नंबरवरून 'प्रिकॉशन डोस' बुक करू शकतात. हेल्थकेअर वर्कर्स यांना सुद्धा बूस्टर डोसबाबत एसएमएस पाठवला जाईल.'
वरातीची वाट पाहत होती वधू, अन् एक मेसेज आल्यावर सरकली पायाखालची जमीन
10 जानेवारी 2022 पासून बूस्टर डोस देण्याचे काम सुरू होणार आहे. बूस्टर डोस म्हणून कोणत्या लसीचा वापर केला जाईल, हे अद्याप समोर आलेले नाही. पहिले दोन्ही डोस ज्या कंपनीच्या लसीचे घेतले आहेत, त्याच कंपनीची लस तिसरा डोस म्हणून दिली जाणार की बदलली जाणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, 15-18 वर्षांच्या मुलांना कोवॅक्सिन दिली जाणार आहे.
देशात कोरोनावरील लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. कोरोनाची दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. दुसरीकडे देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच आता बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येत असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine