21 डिसेंबर गुरु-शनी युती : भारतात या वेळेत पाहता येणार ही 397 वर्षांपूर्वी घडलेली खगोलशास्रीय घटना

21 डिसेंबर गुरु-शनी युती : भारतात या वेळेत पाहता येणार ही 397 वर्षांपूर्वी घडलेली खगोलशास्रीय घटना

एक खगोलशास्रीय घटना आज 21 डिसेंबरला घडणार आहे. सूर्यमालेतल्या गुरु आणि शनी या दोन मोठ्या ग्रहांची युती (Jupiter-Saturn Conjunction) आज होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : आकाशात अनेक घटना घडत असतात आणि त्याबद्दल जगभरातल्या माणसांना कुतूहल असतं. भारतीयांनी याचा खगोलशास्र म्हणून अभ्यास केला आणि अनेक शतकांच्या घटनांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. आधुनिक खगोलशास्रातही अवकाशाचं दर्शन घडवणाऱ्या दुर्बिणी तयार झाल्या आणि संशोधनही केलं गेलं. अशीच एक खगोलशास्रीय घटना आज 21 डिसेंबरला घडणार आहे. सूर्यमालेतल्या गुरु आणि शनी या दोन मोठ्या ग्रहांची युती (Jupiter-Saturn Conjunction) आज होणार आहे. या आधी ही घटना सुमारे 397 वर्षांपूर्वी म्हणजे 1623 मध्ये घडली होती आणि 2080 मध्ये ती पुन्हा घडणार आहे. आजच्या या घटनेत हे दोन्ही सावकाश परिक्रमा करणारे ग्रह एकमेकांपासून 0.1 अंशांत असतील. हिंदुस्थान टाइम्सने एका वृत्तात यासंबंधी माहिती दिली आहे.

या युतीची वेळ अशी आहे की सगळेच जण ही खगोलशास्रीय घटना पाहू शकतील, असं अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचं म्हणणं आहे. हे दोन्ही ग्रह इतके जवळ येणार आहेत की, आकाशात ते दाखवताना तुमच्या हाताच्या करंगळीनेही तुम्ही या दोन्ही ग्रहांना झाकून टाकू शकाल.

एखाद्या माणसाने टेलिस्कोपमधून (Telescope) पाहिलं, तर त्याला गुरूच्या भोवती फिरणारे त्याचे चार मोठे चंद्रही दिसू शकतील. आकाशात नैऋत्येच्या क्षितिजावर सूर्यास्तानंतर ही युती दिसू शकेल.

भारतात साधारण संध्याकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान ही खगोलशास्रीय गुरु-शनी युतीची घटना पाहू शकाल. अनेक शतकांमध्ये एकदा अशी गुरू-शनीची युती घडून येते.

दिल्लीतील नेहरू तारांगणाच्या (Nehru Planetarium) वतीने (https://nehruplanetarium.org/) ही घटना पाहण्यासाठी नोंदणीही सुरू केली आहे. कोविड-19 ची सावधनाता बाळगण्यासाठी गर्दी होऊ नये, म्हणून त्यांनी 20 डिसेंबरपासूनच आकाश निरीक्षण सुरू केल्याचं त्यांच्या वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे. लोक 22 डिसेंबरपर्यंत या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर या घटनेचं वेबकास्टिंगही केलं जाणार आहे.

जर आकाश निरभ्र राहिलं, तर आम्ही या गुरु-शनी युतीच्या घटनेचं युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह स्ट्रिमिंग करणार आहोत, असं बेंगळुरूतील नेहरू तारांगणाने जाहीर केलं आहे.(https://www.taralaya.org/)

या युतीला ख्रिसमस स्टार (Christmas Star) का म्हटलं जातंय? जरी ते दोन ग्रह दूर असले तरीही ते एका मोठ्या ताऱ्यासारखे भासणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावेळी पूर्व क्षितिजावर मोठा तारा दिसला होता अशी कथा आहे. त्याच्या अनुषंगाने या युतीला ख्रिसमस स्टार किंवा स्टार ऑफ बेथलेहेम म्हणतात. द बूक ऑफ मॅथ्युमध्ये बायबलचा हवाला देऊन असं म्हटलंय की, हा तारा आकाशात दिसला होता त्यावेळी जेरुसलेममध्ये या तीन विद्वानांचा जन्म झाला.

आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी 21 डिसेंबर (December Solstice) हा दिवस पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील देशांसाठी वर्षातला सर्वांत लहान दिवस (shortest day of the year) असतो आणि दक्षिण गोलार्धातील लोकांसाठी तो वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो. याचदिवशी ही अवकाशीय युती घडून येणार आहे. ही युती पाहण्यासाठी अनेक उत्सुक आहेत. त्यामुळे संध्याकाळी आकाश निरभ्र नसेल आणि दिसत नसेल, तर नेहरु तारांगणाच्या वेबकास्टिंगला जॉइन करुन हे पाहता येणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 21, 2020, 10:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या