राहुल गांधींच्या फिटनेसचं हे आहे 'सिक्रेट', 49व्या वर्षीही तंदुरुस्त

राहुल गांधींच्या फिटनेसचं हे आहे 'सिक्रेट', 49व्या वर्षीही तंदुरुस्त

राहुल यांना बॅडमिंटनही खेळायला आवडतं. दिल्लीत एकत्र असले की ते आणि प्रियंका गांधी बॅडमिंटन खेळतात.

  • Share this:

नवी दिल्ली,19 जून : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे यावेळी दिल्लीत फारसं सेलिब्रेशन झालं नाही. मात्र जवळच्या सर्वच लोकांनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. सकाळी 9 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं शेड्युल पॅक असतं. सततचे दौरे, भेटीगाठी, प्रचार सभा आणि भेटायला येणाऱ्या माणसांचा प्रचंड ओघ अशा व्यस्त वेळापत्रकात राहुल गांधी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अतिशय जागरुक असतात. योग, ध्यान आणि व्यायाम हे त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट असल्याचं सांगितलं जातं.

 'अकीडो'त (Aikido) ब्लॅक बेल्ट

राहुल गांधी हे 'अकीडो'त ब्लॅक बेल्ट आहेत हे फारच थोड्या लोकांना माहित आहे. काही वर्षांपूर्वी बॉक्सर विजेंदर कुमार याने एका मुलाखतीत राहुल यांना त्यांच्या आवडी-निवडीबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यात त्यांनी आपण 'अकीडो'त ब्लॅक बेल्ट असल्याचं सांगितलं होतं. राहुल यांच्या या उत्तराने त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर काँग्रेसनेच त्यांच्या 'अकीडो'च्या पेहेरावातले फोटो प्रसिद्ध केले होते. 'अकीडो' हा मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. गेली अनेक वर्ष राहुल हे त्याचा सराव करत आहेत. त्याचबरोबर राहुल यांना बॅडमिंटनही खेळायला आवडतं. दिल्लीत एकत्र असले की ते आणि प्रियंका गांधी  बॅडमिंटन खेळतात.

योग आणि ध्यान

राहुल गांधी यांना योग, ध्यान आणि विपश्यनेतही आवड आहे. विपश्यनेसाठी त्यांनी देशात आणि विदेशातही अनेक ठिकाणांना भेट दिल्या आहेत. एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ते नियमित योगासनं आणि ध्यानही करतात. आठवड्यातून काही दिवस ते किमान 10 किलोमीटर चालतात अशीही माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली होती. प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना फिटनेसची अत्यंत आवड आहे. तेही राहुल गांधी यांना फिटनेसच्या टिप्स देत असतात.

वाचनाची आवड

राहुल गांधी यांनी Progressive Economicमध्ये एम फील केलंय. व्यायामासोबतच त्यांना वाचनाचीही आवड आहे. जगभरातल्या चालू घडामोडींसोबतच ते अध्यात्मिक आणि वैचारीक पुस्तकही नियमित वाचतात. विवेकानंद, रमण महर्षी, योगी अरविंद, जे कृष्णमूर्ती यांची पुस्तक वाचायलाही त्यांना आवडतं. आपण शिवभक्त असल्याचं त्यांनीच एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं.

लहानपणी सुरक्षेमुळे त्यांना फारसं खेळता आलं नाही. कायम सुरक्षेच्या घेऱ्यात आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या मोकळ्या जागेतच त्यांना खेळायला मिळत असे. त्याची खंत त्यांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या