प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत अभियान; महाराष्ट्र सरकार धडा घेणार का?

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत अभियान; महाराष्ट्र सरकार धडा घेणार का?

हिवाळ्यात आणि सणासुदीच्या काळात दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणचा (Air Pollution) प्रश्न फारच गंभीर होतो. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अभियानाला सुरुवात केली आहे. दिल्ली सरकारच्या अभियाचा महाराष्ट्र सरकार धडा घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: दरवर्षी हिवाळा, दिवाळी आणि सणासुदीच्या आसपास दिल्लीकरांना धास्ती असते, हवेच्या प्रदूषणाची. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्ली सरकारनी काही दिवसांपासून प्रदूषण रोखण्यासाठी ‘युद्ध प्रदूषण के विरुद्ध’ हे अभियान सुरू केलं आहे. याअंतर्गत धुळीविरुद्ध अभियान सुरू करणं, शेतीतील पालापाचोळा जाळण्याऐवजी जैव विघटनाचं तंत्रज्ञान (Bio Decomposer Technique) वापरणं, वृक्षांची पुन्हा लागवड आणि इलेक्ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसी लागू करणं याचा समावेश आहे. दरवर्षी दिल्लीच्या जवळील भागातील शेतकरी आणि हरियाणातील शेतकरी नवं पिक घेण्यासाठी त्यांच्या शेतातलं पालापाचोळा (स्टबल) जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. त्यासाठी दिल्ली सरकारनी जैव विघटन तंत्रज्ञान वापरलं आहे.

बायो डिकंपोझरचं सोल्यूशन

दिल्लीतील पीयूएसए इन्स्टिट्युटनी पालापाचोळा किंवा शेतातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बायो डिकंपोझरचं सोल्यूशन तयार केलं आहे. ते या पालापाचोळ्यावर टाकलं की त्याचं रुपांतर खतामध्ये होतं. दिल्ली सरकार शेतकऱ्यांना हे सोल्यूशन मोफत देण्याच्या विचारात असून त्यांनी शेजारच्या राज्यांनाही तसंच करण्याचं आवाहन केलं आहे.

स्मॉग टॉवर्स आणि अँटि-स्मॉग गन्स

 संपूर्ण शहरात स्वच्छ हवा पसरवणारा स्मॉग टॉवर उभारण्याचा दिल्लीचा विचार असून त्यासाठी सरकारने शुक्रवारी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दिल्लीतील सर्वाधिक प्रदूषित कनॉट प्लेस परिसरात हा टॉवर उभारला जाणार असून तो हवा स्वच्छ करेल. या टॉवरवर अँटिस्मॉग गन असून त्या गनमधून नेब्युलाइज्डड पाण्याचा फवारा हवेत मारला जाणार आहे. जेणेकरून हवेतील धुळीचे कण खाली बसतील आणि हवा शुद्ध होईल. असा टॉवर केवळ चीनमध्येच आहे.

थर्मल प्लांट बंद करणं

दिल्ली सरकारने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या थर्मल प्लांट बंद करण्याचा निर्णय घेला आहे. आतापर्यंत 2 थर्मल प्लांट बंद केले असून, दिल्लीच्या आजूबाजूला असलेले असे 11 प्लांट बंद करण्यासाठी सरकारने संबंधित राज्य सरकारांना विनंती केली आहे.

वृक्ष लागवड अभियान

केजरीवाल सरकार आपल्या पर्यावरणासंबंधी धोरणांसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीतील इमारती उभारण्यासाठी कापण्यात आलेल्या 80 टक्के झाडांची पुन्हा लागवड करण्यात यावी असं म्हटलं आहे.

नियम मोडणाऱ्यांना दंड

दिल्ली सरकाने एक अँटिपोल्यूशन वॉर रूम तयार केली आहे. या वॉर रुममुळे पर्यावरणासंबंधी कायदे मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जातं. धूळ नियमनासाठीचे नियम मोडणाऱ्यांना 20 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. दिल्लीतील काही भागांत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना एक कोटी रुपयांचा दंड करण्याचं दिल्ली प्रदूषण समितीने जाहीर केलं आहे. सरकारने इलेक्ट्रिक व्हेइकल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिलं आहे. आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी ही पावलं तर उचलली आहेत. महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईतही प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दिल्ली सरकारच्या अभियाचा महाराष्ट्र सरकार धडा घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 22, 2020, 2:03 PM IST

ताज्या बातम्या