नितीन गडकरींच्या मनात चाललंय काय?

नितीन गडकरींच्या मनात चाललंय काय?

पाच राज्यांतल्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर भाजप नेते नितीन गडकरींनी भाजप नेतृत्वाबद्दल अनेक वेळा उलटसुलट वक्तव्यं केली आहेत. अशा गुगली टाकून गडकरींनी काय राजकीय डाव साधला याची चर्चा रंगली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : पाच राज्यांतल्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर भाजप नेते नितीन गडकरींनी भाजप नेतृत्वाबद्दल अनेक वेळा उलटसुलट वक्तव्यं केली आहेत. अशा गुगली टाकून गडकरींनी काय राजकीय डाव साधला याची चर्चा रंगली आहे.

‘भाजपमधल्या काही लोकांनी थोडं कमी बोललं पाहिजे’, असं नितीन गडकरी एका समारंभात म्हणाले आणि सगळ्यांचेच कान टवकारले गेले. पाच राज्यांत भाजपचा पराभव झाल्यानंतर लगेचच एका आठवड्यात  त्यांनी हे वक्तव्य केलं. काही लोकांच्या जास्त बोलण्यामुळेच भाजपचा पराभव झाला, असं त्यांना सूचित करायचं होतं.

त्यानंतर गडकरींनी दुसरी गुगली टाकली ती गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची स्तुती केली. मला पंडित नेहरूंचं म्हणणं पटतं, अस म्हणत त्यांनी इंडिया इज नॉट अ नेशन बट पॉप्युलेशन, या वाक्याची आठवण करून दिली. भारत हा काही देश नाही तर ती एक मोठी लोकसंख्या आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो.

भारताच्या प्रत्येक नागरिकाने कोणतेही प्रश्न निर्माण करायचे नाहीत, असं ठरवलं तर भारतासमोरचे अर्धे प्रश्न सुटतील या पंडित नेहरूंच्या वाक्याचाही त्यांनी दाखला दिला. पंतप्रधान मोदींनी याआधी नेहरूंच्या भूमिकांवर आणि धोरणांवर टीका केलेली असल्याने गडकरींच्या या विधानाचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

गडकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी थेट भाजप नेतृत्वाचाच उल्लेख केला. कोणत्याही नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. पण नंतर मात्र, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

असं असलं तरी पुन्हा महिलांच्या बचतगटाच्या प्रदर्शनात नितीन गडकरींनी इंदिरा गांधींचं कौतुक केलं. महिला आरक्षण नसलं तरी इंदिरा गांधींनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं, अशी टिप्पणी करून गडकरींनी नव्या वर्षात पुन्हा वादाचा धुरळा उडवला.

‘एखाद्या व्यक्तीने ज्ञानाच्या बळावर पुढे जावं, भाषा, जात आणि धर्माच्या जोरावर नव्हे’, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

या सगळ्या विधानांवर कडी केली ती गडकरींच्या सगळ्यात अलीकडच्या विधानाने. ‘ज्याला स्वत:चं घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार ?’ असं गडकरी नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात म्हणाले आणि या वाक्याची जोरदार चर्चा झाली.

आपल्या विधानाचे चुकीचे अर्थ लावले गेले, असं नितीन गडकरी म्हणाले असले तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होता हे कुठेही लपू शकलं नाही. त्यामुळेच गडकरी हे २०१९ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का यावरही चर्चा रंगली.

याआधीही २०१०मध्ये गडकरींनी आपल्या विधानांनी पक्षनेतृत्वाला धक्के दिले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमधल्या मतभेदांचा उल्लेख त्यांनी केला होता आणि हे मतभेद पराभवाला कारण ठरल्याचं सूचित केलं.

नितीन गडकरींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे, असं बोललं जातं. पण नरेंद्र मोदींपेक्षा नितीन गडकरींना संघाचा जास्त पाठिंबा आहे या चर्चेत फारसं काही तथ्य नाही, असा निर्वाळा संघाच्या नेत्यांनी दिला आहे. असं असलं तरी गडकरींच्या या सगळ्या विधानांनी मोदी विरुद्ध गडकरी असे दोन गट सगळ्यांसमोर उघड झाले हेही तेवढंच खरं.

--------------------

First published: March 4, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading