कोलकाता, 22 फेब्रुवारी : पश्चिम बंगालमध्ये सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता फडणवीसांवर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारनंतर आता फडणवीस प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस राज्यात आमनेसामने आलेले असतानाच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या 2 दिवस भाजपच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बजबज आणि महेशताला अशा दोन मतदारसंघांमध्ये सभा आणि यात्रा होणार आहेत. फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी यापूर्वी सोपवण्यात आली होती. एखाद्या राज्यात निवडणुक असल्यास इतर राज्यातील पक्षाच्या नेत्यांना त्या राज्यात प्रचाराला पाठवण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. राज्यातील पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्यावर पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 2011 आणि 2016 साली तृणमूल काँग्रेसने सलग दोन वेळा सत्ता मिळवत राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. सलग 34 वर्षं सत्ता असलेल्या डाव्या पक्षांना हटवून तृणमूलने इतिहास निर्माण केला होता. यानंतर डाव्या पक्षांचं राज्यातलं अस्तित्वदेखील निवडणुकीत दिसेनासं झालं आहे. अशा वेळी सत्ताधारी तृणमूलला सत्तेवरुन हटवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
(वाचा - नारायण स्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 42 पैकी तब्बल 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे तृणमुलला यावेळेस विधानसभेत दे धक्का करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. याची चुणूक भाजपने लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखवली होती. तृणमूलला 22 जागा लोकसभेत मिळाल्या होत्या. यावरुन दोन्ही पक्षात काटे का टक्कर आहे हे स्पष्ट होतंय.
(वाचा - Pooja Chavan Case: संजय राठोडांसाठीचा 'तो' मेसेज होतोय व्हायरल, नेमका अर्थ काय?)
काॅंग्रेसला एक तर डाव्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. तृणमूल आणि भाजपमध्ये थेट आमनेसामने लढत आहे. त्यामुळेच भाजपने सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये लावलेली दिसतेय. म्हणूनच फडणवीस यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात प्रचार करताना दिसणार आहेत. नुकतीच सीबीआयने पश्चिम बंगालमधील कोळसा चोरी प्रकरणाच्या तपासात ममतांच्या भाच्याच्या पत्नीला चौकशीची नोटीस बजावली असून यामुळे राज्यातील भाजप विरुद्ध तृणमूल संघर्ष अधिक वाढताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, West bengal