Home /News /national /

बडा नेता ईडीच्या कैदेत, बंगालच्या मुख्यमंत्र्यांची मोदींना भेट, ममता दिदींचे हात दगडाखाली की आणखी काय?

बडा नेता ईडीच्या कैदेत, बंगालच्या मुख्यमंत्र्यांची मोदींना भेट, ममता दिदींचे हात दगडाखाली की आणखी काय?

ममता आणि मोदी यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ममता बॅनर्जी या भाजपच्या निंदक आहेत. त्यांचं आणि भाजपचं अजिबात जमत नाही.

    नवी दिल्ली, 5 जुलै : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ममता दिदी आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ममता आणि मोदी यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ममता बॅनर्जी या भाजपच्या निंदक आहेत. त्यांचं आणि भाजपचं अजिबात जमत नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी ममता बॅनर्जी संपूर्ण देशभरात विरोधाकांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता यांनी अनेकदा मोदींची भेट घेणं टाळलं आहे. असं असताना आज अचानक ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने देशाच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? अशी चर्चा सुरु झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील एका बड्या नेत्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या सगळ्या घडामोडी आता देशाला पुढच्या काही दिवसांमध्ये नवी राजकीय समीकरणं दाखवतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत असं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागावा यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने साम-दाम-दंड-भेद वापरत तिथे आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता. भाजपला त्यात यशही आले होते. पण निवडणुकीनंतर बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार बघायला मिळाला होता. अखेर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या बड्या नेत्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. (मोदींच्या भेटीनंतर ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा देणार होते राजीनामा, पण...; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट) ममता आणि भाजप यांच्यातील टोकाचा संघर्षाच्या अनेक घटना आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी हे एका कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. पण त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपबद्दल भर मंचावर नाराजी व्यक्त केली होती. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि ममता सरकार यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत असल्याचं समोर आलं होतं. अशा अनेक घटना आहेत. पण सध्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये काही दिवसांपूर्वी मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी हे सध्या ईडीच्या कोठडीत आहे. शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी ममता सरकारवर प्रचंड टीका होत आहे. या घोटाळ्यामुळे ममता सरकारची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलिन झाली आहे. ममता यांनी पार्थ चॅटर्जी यांच्याकडून राजीनामा घेतला आहे. त्यानंतर फक्त मंत्रिमंडळच नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण तरीही ममता यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. ममता गप्प आहेत. त्यांच्या या गप्प राहण्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींनंतर ममता यांनी मोदींची घेतलेली भेट पुढच्या काही दिवसांमध्ये नवं राजकीय समीकरण घेवून येते की काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, ममता या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Mamata banerjee, Narendra modi

    पुढील बातम्या