Home /News /national /

दीदींच्या बंगाली बालेकिल्ल्याला सुरुंग लावायची जबाबदारी भाजपने दिली मराठी मोहऱ्यांकडे

दीदींच्या बंगाली बालेकिल्ल्याला सुरुंग लावायची जबाबदारी भाजपने दिली मराठी मोहऱ्यांकडे

भारतीय जनता पक्षाने (BJP in west bengal) पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी आपल्या मराठी नेत्यांच्या हाती सोपवली आहे. कोण आहेत हे मोहरे?

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तरी भाजपच्याच जागा या राज्यात जास्त आल्याने त्यांचं सत्तेत वर्चस्व राहणार हे उघड आहे. बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चा वळवला आहे. या राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची जबाबदारी भाजपने मराठी मोहऱ्यांकडे दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्याचं पाच विभागांमध्ये विभाजन केलं आहे. या पाच विभागांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांकडे दिली आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि ठरलेल्या रणनीतीच्या आधारे प्रचार करून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला पद्धतशीर सुरुंग लावण्याची भाजपची योजना आहे. त्यासाठी पाच प्रमुख नेत्यांकडे पाच विभाग सोपवण्यात आले आहेत. या पाच नेत्यांमध्ये सुनील देवधर आणि विनोद तावडे हे मराठी मोहरे आहेत. त्यात मिदनापूर झोन सुनील देवधरांकडे असण्याची शक्यता आहे. डाव्यांच्या आणि तृणमूलच्या प्रभावाखालील या प्रांतात भाजपने शिरकाव केलेला आहे. आता या भागातली सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. उत्तर बंगालमधला एक झोन विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विनोद तावडे यांच्याकडे भाजपने हरियाणाचं प्रभारीपदही सोपवलं आहे. मध्य प्रदेश आणि हैदराबादमध्ये मराठी नेते भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर आता कुठली जबाबदारी देणार याविषयी चर्चा सुरू होती. आता त्यांना पक्षाने केंद्रीय कार्यकारिणीवर सहभागी करून घेतलं आहे. त्यांच्याकडे सरसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असून मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. दुसरीकडे दक्षिणेकडे हैदराबादमध्ये महापालिकेच्या निवडणुकीचा भार आशिष शेलार या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या नेत्यावर सोपवण्यात आला आहे. आमदार आशिष शेलार यांना केंद्रीय नेतृत्त्वाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation election) भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: BJP, Vinod tawde, West bengal

    पुढील बातम्या