कोलकाता, 25 नोव्हेंबर : पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकी (West Bengal Election) होणार आहेत. यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवरून राजकारण तापलं आहे. गांगुली राजकारणात येऊ शकतो आणि भाजपचा चेहरा होऊ शकतो अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहेत. दरम्यान, आता तृणमूल कॉंग्रेसने यावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. TMCचे खासदार सौगात रॉय म्हणाले की, 'सौरवनं असा निर्णय घेतला तर मला फार वाईट वाटेल'.
क्रिकेटमधला दादा सौरव गांगुली पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. सौगत रॉय म्हणाले की, 'सौरव गांगुली हे सर्व बंगाली लोकांचे प्रतीक आहेत, त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यास वाईट वाटेल. बंगालकडून तो एकमेव क्रिकेट कॅप्टन होता, राजकारणात त्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही, त्यामुळे तो इथं टिकू शकणार नाही'.
सौरव गांगुलीवरून राजकारण तापलं
एवढेच नाही तर टीएमसीचे खासदार म्हणाले की, सौरव गांगुली यांना देश व गरिबांच्या समस्यांबद्दल माहिती नाही, तसेच त्यांना दारिद्र्य आणि मजुरांच्या समस्यांविषयीही माहिती नाही. भाजपवर टीका करताना सौगाता रॉय म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडे उमेदवार नाही, म्हणूनच ते अशा गोष्टी पसरवत आहेत. दुसरीकडे बर्याच काळापासून असा अंदाज वर्तविला जात आहे की सौरव गांगुली हा भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असू शकतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही आहे.
निवडणुकीत होणार भाजपचा चेहरा?
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालमध्ये होते तेव्हा त्यांनाही याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र अमित शहा यांनी यावर उत्तर न देता म्हटले की आतापर्यंत असे काहीही झाले नाही, जेव्हा जेव्हा निर्णय होईल तेव्हा माहिती दिली जाईल. याआधी स्वत: सौरव गांगुली यांनी अनेकदा त्यांच्या राजकारणामध्ये भाग घेतल्याची चर्चा खोट्या असल्याचे सांगितले होते. मे 2021 मध्ये बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत टीएमसी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.