पंतप्रधान मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना घाबरले - राहुल गांधी

पंतप्रधान मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना घाबरले - राहुल गांधी

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या मार्गात चीननं पुन्हा घातला खोडा, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली खोचक टीका

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मार्च : 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या मार्गात चीननं पुन्हा एकदा खोडा घातला आहे. या घटनेचं आता देशात राजकारण होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचा विरोधी पक्ष काँग्रेसनं यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना घाबरले. संयुक्त राष्ट्र संघात चीनने भारतविरोधी भूमिका घेऊनही मोदी एक शब्द उच्चारू शकले नाहीत', अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये क्षी जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर झोके घेतात, दिल्लीत जिनपिंग यांची गळाभेट घेतात, चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात', असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

रणदीप सुरजेवाला यांचाही पंतप्रधान मोदींवर निशाणा

वाचा : 'इमरान खान इतके उदार आहेत तर मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावे'

दुसरीकडे, दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खडेबोल सुनावले आहेत. 'गोळीबार आणि चर्चा एकत्रित होऊ शकत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार नाही',अशा शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. यावेळेस त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अझहरला आमच्या ताब्यात द्यावे. इमरान खान यांनी ही उदारता दाखवावी', असे थेट हल्लाबोल स्वराज यांनी केला आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघनटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात, असंही त्यांनी यावेळेस म्हटलं.

वाचा : चीनने पुन्हा घातला खोडा, मसूद अझहर जागतिक दहशतवादी नाही

दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित केलं जाऊ शकत नाही. कारण चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता.

अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स ने 15 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझहरवर सर्व स्तरांवरून बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या शस्त्रांचा व्यापार आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांवर प्रतिंबध घालण्यात यावं. त्याच बरोबर त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी असं या प्रस्तावात मांडण्यात आलं आहे. कुख्यात दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतासोबत अमेरिकानंदेखील आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केलं जावं, अशी मागणी वारंवार भारताकडून केली जात होती.  अमेरिकेची साथ मिळत असल्यानं भारताच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं होतं. मात्र, दुसरीकडे या प्रकरणात चीनने पुन्हा खोडा घातला आहे.

दहशतवादाविरोधातील मोहिमेत भारतासोबत आहोत, असे अमेरिकेनं अनेकदा जाहिररित्या सांगितले होतं. याबाबत प्रतिक्रिया देताना अमेरिकेने म्हटलं होतं की,'जैश-ए-मोहम्मद ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे आणि मसूद अझहर या संघटेनाचा म्होरक्या आहे. त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जे पाऊल उचललं होतं. ते फसलं तर शांततेला धोका पोहोचू शकतो.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

First published: March 14, 2019, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading