मुंबई, 22 मार्च : आपल्या पत्रामुळे चर्चेत आलेल्या पिंकीने आणखी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये तिने नोकरीसोबत हुंड्याचा मुद्दाही उचलला आहे. पिंकीने हे आपलं शेवटचं पत्र असेल असंही स्पष्ट केलं आहे. मागच्याच महिन्यात पिंकीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये नोकरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. प्रख्यात लेखक प्रभात बांधुल्य यांनी पिंकीच्या पत्राला उत्तर दिलं होतं. यानंतर आता पिंकीने आणखी एक पत्र लिहिलं आहे.
माझं लग्न जमवण्यासाठी वडील जातात तेव्हा मुलांकडून हुंड्याची मागणी केली जाते. जर मी नोकरी करत असते तर कुणीही हुंडा मागितला नसता, असं पिंकी तिच्या पत्रात म्हणाली आहे.
पिंकीचं पत्र
मी पिंकी, फ्रॉम पटना, हे माझं शेवटचं पत्र आहे.
याआधी मी दोन पत्र लिहिली, त्याचं उत्तर लेखक प्रभात बांधुल्य यांनी दिलं, पण तेजस्वीजींकडून काहीही उत्तर आलं नाही. मी 22 मार्चला मीडियासमोर येणार होते आणि रोजगार किती महत्त्वाचा आहे, ते सांगणार होते. जॉब नसेल तर लग्न होणार नाही. वडील कुठेही मुलगा बघायला जातात तेव्हा हुंड्याची मागणी केली जाते. मुलीला नोकरी असती, तर अशी अडचण झाली नसती, असं आई बाबांना सांगत होती. मी मीडियासमोर येऊन बोलू शकते, पण मी समोर आले तर सगळे जण मला टार्गेट करतील. गावात, समाजात माझी आणि माझ्या वडिलांची बदनामी होईल ते वेगळं.
ही समस्या फक्त माझीच नाही, तर या भागातल्या अनेक मुलींची आहे. बाबांना कुणी मुलाबाबत सांगितलं तर ते खूप अपेक्षेने जातात, पण त्यांच्या मोठ्या मागण्या ऐकून निराश होऊन परत येतात. मला सरकारसोबत कोणतीही लढाई लढायची नाही. मनात आलं म्हणून पत्र लिहिलं. हे शेवटचं पत्र आहे, जेवढ्या लवकर नोकरी लागेल, तेवढ्या लवकर लग्न होईल आणि वडिलांवरचं ओझं कमी होईल. सगळ्यांना प्रणाम, धन्यवाद.
कोण आहे पिंकी?
लेखक प्रभात बांधुल्य यांनी सांगितलं की पिंकी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे, जिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. रुढीवादी कुटुंबामध्ये तिने बंड करत शिक्षण मिळवलं. शिकून नोकरी मिळेल आणि आयुष्य मार्गी लागेल, असं तिने कुटुंबाला सांगितलं, पण तसं झालं नाही. आता ती बेरोजगार असल्यामुळे चिंतेत आहे. मुलीचं लग्नच करणार नाही का? असे टोमणे तिच्या वडिलांना शेजारचे आणि नातेवाईकांकडून ऐकावे लागतात. वडिलांना पिंकीवर भरवसा असला तरी, परिस्थितीमुळे तिचे वडील बेजार झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18