उच्छाद घालणाऱ्या वानरसेनेला पळवण्यासाठी गावकऱ्यांचा 'अस्वल' अवतार

उच्छाद घालणाऱ्या वानरसेनेला पळवण्यासाठी गावकऱ्यांचा 'अस्वल' अवतार

वानरांना पिटाळून लावण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. गावकरी चक्क अस्वलाचा ड्रेस घालून वानरांना पळवून लावत आहेत.

  • Share this:

लखनौ, 01 जानेवारी: गेल्या काही वर्षात वन्य प्राणी आणि माणसांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कधी बिबट्या, कधी वाघ तर कधी रानडुकरांनी मानवी वस्तीत हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या सिकंदरपूर परिसरातील अफगाण गावात वानरांनी अक्षरश: उच्छाद घातला आहे. गावकरी या वानरांच्या त्रासाला चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे  या वानरांना पिटाळून लावण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. गावकरी चक्क अस्वलाचा ड्रेस घालून वानरांना पळवून लावत आहेत.

काही महिन्यांपासून ग्रामस्थांना वानरांचा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामस्थांनी त्याची तक्रार तहसील कार्यालयात दिली. त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंतीही केली. पण प्रशासनानं त्याची कसलीही दखल घेतली नाही. वानरांची ही टोळी शेतीतली पीकं फस्त करत आहे. त्यांची नासधूस करत आहे. घरादारात ठेवलेल्या वस्तू घेवून वानर पळून जातात. लहान मुलांचे चावे घेतात. एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षात वानरांच्या भीतीनं गावातल्या दोन महिला छतावरून पडून मृत्यूमुखी पडल्या.

वानरांच्या या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी गावकऱ्यांनी नामी शक्कल लढवलीय. गावातले तरूण अस्वलाचा पोषाख परिधान करतात आणि गावभर फिरून वानरांना पळवून लावतात. वानरांच्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देवूनही त्याची दखल घेतली जात नाही. वन विभागानं एकवेळ गावात टीम पाठवली. त्यांनी वानरांना पकडणाऱ्या एका संस्थेला बोलावून हा प्रश्न सोडवण्याचा शब्दही दिला. पण त्या संस्थेनं एका वानराला पकडण्यासाठी 300 रुपयांची मागणी केली. पण वानरांची संख्या इतकी प्रचंड होती की पुढे हा व्यवहार होवू शकला नाही.

वानरांना कोणीही पकडत नाही, तर गावकरी केवळ अस्वलाच्या पोषाखात वानरांना पळवून लावताहेत. त्यामुळे वानरांचा बऱ्यापैकी बंदोबस्त झालाय. आता त्यांनी नुकसान केल्याच्या तक्रारीही कमी झाल्यात. पण यापुढे वानरांचा त्रास आणखी वाढला तर प्रशासनाच्या वतीनं वानरांना पकडण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी आदर्श कुमार यांनी दिली. त्यामुळे सध्यातरी अस्वलाच्या पोषाखाच्या युक्तीनं वानरांपासून मुक्ती दिलीय असंच म्हणावं लागेल.

First published: February 1, 2020, 9:31 PM IST

ताज्या बातम्या