धक्कादायक! घोड्यावरून वरात काढली म्हणून दलितांना अख्ख्या गावाने टाकलं वाळीत

धक्कादायक! घोड्यावरून वरात काढली म्हणून दलितांना अख्ख्या गावाने टाकलं वाळीत

वरात काढल्यानंतर दोनच दिवसात या गावाने दलितांवर बहिष्कार टाकला. दलितांना गावकरी अन्न-धान्य, दूध काहीच विकत नाहीयेत. रिक्षावाले जवळच्या गावात त्यांना घेऊन जायलाही तयार नाहीत.

  • Share this:

अहमदाबाद, 9 मे : घोड्यावरून लग्नाची वरात काढली म्हणून दलितांना साऱ्या गावाने वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. वरात काढल्यानंतर दोनच दिवसात या गावाने दलितांवर बहिष्कार टाकला. या गावातल्या दलितांना कुणी दुकानदार काही विकत नाही, एवढंच नाही तर त्यांना रिक्षावालेसुद्धा आपल्या रिक्षातून प्रवास करू देत नाहीत. त्यामुळे या गावातल्या दलितांचं रोजचं जगणं मुश्कील झालं आहे.

मेहुल परमार या दलित  तरुणाच्या लग्नाची वरात गावातून काढण्यात आली. मेहुलची घोड्यावरून वाजत-गाजत वरात निघाल्याच्या दोन दिवसानंतर मेहसाणा जिल्ह्यातल्या लोर नावाच्या त्याच्या गावात इतर गावकऱ्यानी दलितांवरच बहिष्कार टाकला आहे. दलितांनी लग्नाची वरात घोड्यावरून काढण्यास कथित उच्चवर्णीयांचा आक्षेप आहे.

या सामाजिक बहिष्काराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काही दलित नेते गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या काडी तालुक्यातल्या लोर गावात पोहोचले आहेत. इथल्याच परमार कुटुंबीयांच्या लग्नाच्या वरातीवरून गावात तणाव निर्माण झाला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त गावाता आहे.


VIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'

BhimaKoregaon  काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास?

"आमची वरात गावातून काढली गेली. त्यानंतर स्थानिकांनी आमच्याविरोधात ठराव पास करायला बैठक बोलावली आणि आम्हाला वाळित टाकलं गेलं. आता गावातला कुणीही आम्हाला काहीही विकायलाही तयार नाहीये. आम्हाला साधं दूधसुद्धा कुणाकडून आणता येत नाही", मेहुल परमार हा नवरा मुलगा म्हणाला. आमच्या लग्नात अशी वरात काढायची परवानगी समाज देत नाही, असं वंदना परमार या दलित महिलेनं सांगितलं.


नरेंद्र मोदींचे काका ओळख लपवून घेत होते रूग्णालयात उपचार

मोदींचा दावा खरा की खोटा? राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावर माजी अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

दलित नेते आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी असा सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मेहसाणाच्या पोलीस उपअधीक्षक मंजिता वंजारा News18 शी बोलताना म्हणाल्या, "कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्ही गावातल्या दलित मोहल्ल्यात गेलो होतो. आम्ही तिथल्या रहिवाशांना मदत करत आहोत. दलित वराच्या वरातीला सरपंचासह इतर गावकऱ्यांनी विरोध केला आणि त्यातून हा बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे", असं मंजिता वंजारा म्हणाल्या.

गुजरातचे सामाजिक न्याय मंत्री ईश्वर परमार यांनी याप्रकरणी तपास सुरू केला असल्याचं सांगितलं. यामध्ये सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असं ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या