बिजापूर, 05 मे: छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यात सैनिकांवर नक्षलवादी हल्ला (Naxal Attack) होणं हे काही नवीन नाही. त्यामुळे नक्षली कारवायांना चाप घालण्यासाठी सैनिक अनेकदा या जंगली भागात मोठ्या कारवाया करत असतात. नक्षलवाद्यांवर कारवाई करत असताना कित्येकदा यामध्ये निष्पाप लोकांचाही जीव जातो. अशीच एक घटना डिसेंबर 2020 मध्ये घडली आहे. बिजापूर जिल्ह्याच्या गामपूर येथील रहिवासी असणाऱ्या बदरू नावाचा 22 वर्षीय युवक जंगलात महुआची फुलं वेचण्यासाठी गेला होता.
यावेळी खाकी वर्दीतील जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात बदरू नावाच्या युवकाचा जागीचं मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. त्यामुळे गावातील काही लोकं घटनास्थळी धावत गेले. यावेळी खाकी वर्दीतील काही लोकं संबंधित युवकाचा मृतदेह पायाला धरून ओढत घेऊन चालले होते. पोलिसांनी या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, परंतु मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं लागलं, त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला.
मृत बदरू हा नक्षली टोळीशी संबंधित असून तो जन मिलिशिया चा कमांडर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी बदरूकडे बॉम्ब आणि अत्याधुनिक हत्यार मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण ग्रामस्थांच्या मते, बदरू हा निष्पाप असून तो जंगलात महुआची फुलं वेचण्यासाठी गेला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जीवे मारलं.
हे वाचा-कोरोनातून वाचला असता पण रुग्णालयातून पळ काढणं भोवलं! भरधाव ट्रकने दिली धडक आणि..
त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी बदरूच्या मृतदेहावर कोणतं तरी औषध लावलं असून त्याचा मृतदेह जमीनीच्या आत ठेवला आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. बदरूच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली, असून फक्त हाडं उरली आहेत. अशा स्थितीतही गामपूर गावातील रहिवासी न्यायासाठी लढत आहेत. बदरूचं पुर्ण नाव बदरू माडवी असून तो गामपूर गावातील माडवी पाड्यात राहत होता.
हे वाचा- अवघ्या 1 वर्षाच्या चिमुरडीने दिला बापाला मुखाग्नी; नक्षली हल्ल्यात 5 जवान शहीद झाल्याने देश हळहळला
याप्रकरणी बीजापूर उच्च न्यायालायात जाऊन न्यायाची भीक मागणार असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात देशात आणि राज्यात कोरोना विषाणूमुळे न्यायालयात जाता आलं नाही. पण आता आम्ही न्यायालयात जाऊन न्यायाची भीक मागणार आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatisgarh, Crime news, Naxal Attack