नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहेत. मल्ल्याला भारतातकडे सोपवण्यासाठी ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. या निर्णयाविरुद्ध मल्ल्या ब्रिटनच्या उच्च न्यायालयाकडे अपिल करू शकतो. यासाठी त्याच्याकडे 14 दिवसांची मुदत असेल.
भारतातील बँकांमध्ये घोटाळा करुन विजय मल्ल्या 2016 मध्ये फरार झाला होता. त्याला लंडनमधील वेस्टमिनिस्टर कोर्टाने आधीच भारताकडे प्रत्यार्पण करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आता ब्रिटनच्या गृहमंत्रालयानेही मंजूरी दिल्याने त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्हाला मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या गृहसचिवांनी सही केल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिटनच्या या निर्णयाचं स्वागत करतो. तसंच मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघत आहोत.
काय आहे मल्ल्या प्रकरण?
देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती.
भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.
मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.
या आधी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातल्या भांडणामुळे त्या दोघांनाही केंद्र सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.
काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.
#MustWatch आजचे टॉप 5 न्यूज व्हिडिओ पाहा 2.30 मिनिटांत