Elec-widget

भारतात यायला का घाबरतोय मल्ल्या? कोर्टाच्या निर्णयाला देणार आव्हान

भारतात यायला का घाबरतोय मल्ल्या? कोर्टाच्या निर्णयाला देणार आव्हान

भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यतून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगत असलेल्या विजय मल्ल्या लंडनच्या कोर्टाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार आहे. 10 डिसेंबरला लंडनच्या कोर्टानं त्याला भारतात सोपविण्याचा निर्णय दिला होता. त्याला आव्हान देण्यासाठी मल्ल्याकडे 14 दिवस आहेत. आपल्या वकिलामार्फेत तो कोर्टात या निर्णयाला आव्हान देणार आहे.


भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यतून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.


मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली  पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.

Loading...


या आधी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातल्या भांडणामुळे त्या दोघांनाही केंद्र सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.


सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी'  हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.


काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.


देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती.


मध्यंतरी विजय मल्ल्याने लंडनमधील कोर्टाबाहेर धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो असा खळबळजनक खुलासा विजय मल्ल्याने केला होता. तसंच तडजोडीचा प्रस्ताव दिला होता पण त्यावर काही तोडगा निघाला नाही असा दावाही मल्ल्याने केला.


मात्र, अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याचा दावा खोडून काढला होता. विजय मल्ल्याचं वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे, माझी अशी कोणतीही भेट झाली नव्हती असा दावा जेटलींनी केला होता.


विजय मल्ल्यासाठी सज्ज आहे आर्थर रोड तुरूंग


विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती.


विजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती.


यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक 12 मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...