Home /News /national /

डेंग्यू, मलेरिया आजार देणाऱ्या डासांची 'इथे' घेतली जाते विशेष काळजी

डेंग्यू, मलेरिया आजार देणाऱ्या डासांची 'इथे' घेतली जाते विशेष काळजी

डास म्हटलं कोणालाही अगदी नकोसं होतं. कारण डास आजारपणाला निमंत्रण देणारे असतात.

    मुंबई, 6 जुलै : डासांमुळे डेंग्यू (Dengue), मलेरिया यांसारखे (Malaria) अनेक गंभीर आजार (Disease) होतात. या आजारांवर ठोस उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी संशोधन सुरू आहे. हे आजार टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणं, डासांचं निर्मूलन करणं आदी उपाय केले जातात. परंतु, यामुळे अपेक्षित परिणाम होतोच असं नाही. डासांमुळे (Mosquito) होणारे आजार रोखण्यासाठी पुदुच्चेरीमधली व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर (Vector Control Research Center) ही देशातली सर्वांत मोठी संस्था दीर्घ काळापासून संशोधन करत आहे. या सेंटरमध्ये लाखो जिवंत आणि मृत डास आहेत. संशोधनासाठी या डासांचा उपयोग केला जातो. यात एक आश्चर्याची गोष्टदेखील आहे. डासांवर संशोधन करण्यासाठी त्यांचं संगोपन आवश्यक असतं. या सेंटरमध्ये डासांचं संगोपन, आहार आणि प्रजननावर विशेष लक्ष दिलं जातं. हे समजल्यावर नवल वाटेल; पण ही बाब खरी आहे. या सेंटरमध्ये डासांना पोषक आहार (Healthy Diet) दिला जातो. या आहारावरदेखील सेंटरनं विशेष संशोधन केलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डास म्हटलं कोणालाही अगदी नकोसं होतं. कारण डास आजारपणाला निमंत्रण देणारे असतात. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होतात. या आजारांवर ठोस उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर संशोधन करत आहे. या डासांचं ब्रीडिंग बदलून डेंग्यूच्या उपचारांसाठी डासांचा वापर करता येईल का, या दृष्टीने प्रयोग केले जात आहेत. डासांमुळे अन्य कोणते आजार होतात, यावरही येथे सातत्यानं संशोधन सुरू आहे. संशोधनासाठी हे सेंटर देशातल्या प्रत्येक राज्यातून डास जमा करतं. `या संस्थेच्या संशोधनातून लवकरच डेंग्यूवर ठोस उपाय मिळू शकतो; मात्र यासाठी या डासांना सुरक्षित आणि निरोगी ठेवणं आवश्यक आहे,` असं या सेंटरचे संचालक डॉ. अश्विनी कुमार यांनी सांगितलं. व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरमध्ये डासांच्या संगोपनाची विशेष काळजी घेतली जाते. डासांच्या आहाराकडे लक्ष दिलं जातं. तसंच त्यांच्या आहारावर सातत्यानं नवनवीन प्रयोग केले जातात. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर 'व्हीसीआरसी'च्या शास्त्रज्ञ डॉ. निशा मॅथ्यू आणि त्यांच्या पथकानं डासांसाठी खास पोषक आहार तयार केला असून, त्याला मंगळवारी (5 जुलै) पेटंटही (Patent) मिळालं आहे. खरंतर डासाच्या मादीला पोषणासाठी, तसंच अंडी घालण्यासाठी मानवी रक्त (Human Blood) मिळत राहणं आवश्यक आहे. यासाठी सेंटरला रक्तपेढीची (Blood Bank) मदत घ्यावी लागत होती. काही वेळा डासांसाठी रक्ताची व्यवस्था करणं कठीण जात होतं. रक्तपेढीकडून या सेंटरला कालबाह्य होणार असलेल्या किंवा काही कारणास्तव मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या रक्ताचा पुरवठा होत असे; मात्र ही समस्या कायमची सोडवण्यासाठी सेंटरने डासांसाठी आर्टिफिशियल डाएट (Artificial Diet) अर्थात कृत्रिम आहार तयार करण्यासाठी काम सुरू केलं. गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या 18 प्रकारचे पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्यात आले. त्यापैकी डासांनी चार प्रकारचे पदार्थ खाणं सुरू केलं. यामुळे त्यांचं आरोग्य आणि प्रजनन क्षमताही चांगली राहिली. आश्चर्याची बाब म्हणजे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या पदार्थांमध्ये मल्टीव्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स आणि कोलेस्टेरॉल यांसारखे पोषक घटक होते. हे पदार्थ डासांना खायला घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका विशेष फीडरची (Feeder) निर्मिती केली आहे. या फीडरमध्ये एक जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून डास पावडरसारखा पदार्थ सहजपणे खाऊ शकतात. पूर्वी हा फीडर परदेशातून मागवला जायचा. त्या फीडरची किंमत 50 हजार रुपये होती. परंतु, पुदुच्चेरीतल्या या सेंटरने एक नवा फीडर तयार केला. त्या फीडरची किंमत केवळ 1000 रुपये आहे. डासांना आहार सहज घेता यावा, यासाठी फीडरचं तापमान मानवी शरीराच्या तापमानाप्रमाणे 36 अंश सेल्सिअस ठेवलं जातं. डासांपासून होणाऱ्या आजारांवर ठोस उपचार मिळावेत, यासाठीच्या संशोधनाकरिता या सर्व गोष्टी केल्या जात असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
    First published:

    पुढील बातम्या