'वायू' चक्रीवादळाची दिशा पुन्हा बदलली, आता यावेळी धडकण्याचा धोका
गुजरातच्या दिशेनं सरकणाऱ्या वायू चक्रीवादळाची दिशा पुन्हा बदलली आहे. आता हे वादळ द्वारका आणि वेरावळच्या मधून जाईल, असा अंदाज आहे. 13 जूनच्या दुपारी हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याचा धोका आहे.
मुंबई, 12 जून : गुजरातच्या दिशेनं सरकणाऱ्या वायू चक्रीवादळाची दिशा पुन्हा बदलली आहे. आता हे वादळ द्वारका आणि वेरावळच्या मधून जाईल, असा अंदाज आहे. 13 जूनच्या दुपारी हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याचा धोका आहे. वायू चक्रीवादळामध्ये 155 ते 165 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाचा फटका गुजरातमध्ये कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर इथे बसू शकतो.
वादळाच्या धोक्यामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 1 लाख 60 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गुजरातला या वादळाचा धोका असला तरी मुंबईचा धोका मात्र टळला आहे. वायू वादळामुळे मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
IMD: Very Severe Cyclonic Storm #VAYU about 280 km is nearly south of Veraval (Gujarat) & 360 km nearly south of Porbandar (Gujarat). It'll cross Gujarat coast between Dwarka and Veraval as a Very Severe Cyclonic Storm with wind speed 155-165 kmph around afternoon of 13th June. pic.twitter.com/E5eD6wM1Ij
वादळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमधल्या किनारपट्टीची हवाई पाहणीही सुरू आहे.