मुंबई, 11 जून : राज्य मान्सूनच्या प्रतिक्षेत असताना आता हवामान विभागानं महाराष्ट्र आणि गुजरातला वायू चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला वायू असं नाव देण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांना हा धोका अधिक आहे. याबाबत हवामान विभागानं हाय अलर्ट देखील जारी केला आहे. धोका लक्षात घेता मच्छिमारांनी देखील समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 आणि 14 जूनला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून प्रति तास 31 किमी वेगानं वारे महराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेनं वाहत आहेत. राज्यात सध्या तापमानात देखील वाढ झाली असून नागरिकांचं लक्ष हे मान्सूनकडे लागून राहिलं आहे.
नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी
जोरदार वारे वाहणार
हवामान विभागानं केरळ, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात 11 जून रोजी ( आज ) 65 ते 85 किमी प्रति तास वेगानं वारे वाहतील असा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, 12 आणि 13 जूनला अरबी समुद्राच्या मध्य पूर्व आणि उत्तर पूर्व क्षेत्रामध्ये 90 ते 115 किमी प्रति तास वेगानं वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अलर्ट नंतर राज्यांनी देखील एनडीआरएफच्या टीम्सना संभाव्य अलर्टबाबत कळवलं आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस
राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, मुंबई, कोकण, ठाणेसह आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तर, नाशिकमध्ये 2 दिवसामध्ये 3 जणांचा बळी गेला. मृत्यू पडलेल्या लोकांना सरकारनं 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.
VIDEO: बुलडाण्यात अग्नितांडव, शेती उपयोगी साहित्य जळून खाक