'पुरुष लुंगी नेसून भेटू शकतात पण महिला...' वसुंधरा राजेंचं ट्विट व्हायरल

'पुरुष लुंगी नेसून भेटू शकतात पण महिला...' वसुंधरा राजेंचं ट्विट व्हायरल

जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात वसुंधरा राजेंनी महिलांसमोर बोलताना केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी एका कार्यक्रमात महिला आणि पुरुषांना त्यांच्या कामामध्ये कशा अडचणी येतात हे सांगितलं. त्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातील काही अंश ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. वसुंधरा राजे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना ते वक्तव्य केलं. विरोधकांनी आपल्याबाबत अनेक अफवा पसरवल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जयपूरमध्ये बिडला इथं अखिल भारतीय क्षत्रिय महासभा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 12 नोव्हेंबरला झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पुरुष मंत्री, नेते यांच्याप्रमाणे महिला मंत्री आणि नेत्या जास्त वेळ कार्यकर्त्यांना देऊ शकत नाहीत, भेटू शकत नाहीत हे सांगताना त्यामागचं कारण सांगितलं आहे. महिलांना काही मर्यादा असतात असंही वसुंधरा राजे म्हणाल्या.

माझ्या विरोधकांनी आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांनी अफवा पसरवली आहे की, मी रात्री 10 नंतर भेट घेत नाही. त्यांना समजायला हवं की, पुरुष आणि महिला नेत्यांच्या कामात फरक असतो. पुरुष रात्री लुंगी नेसून कोणालाही भेटू शकतात, मात्र महिला रात्री लोकांना भेटू शकत नाहीत. कारण त्यांना मर्यादा पाळाव्या लागतात असं ट्विट वसुंधरा राजेंनी केलं आहे.

त्यांनी पुढे असंही म्हटलं की, माझे विरोधक फक्त नकारात्मक गोष्टी पसरवतात. पण मी त्यामुळे मागे हटणार नाही आणि लोकांची सेवा करणं सोडणार नाही. तुम्हीही अशा गोष्टींची काळजी करू नका. सेवा करायची असेल तर अशा आव्हानांचा सामना करावाच लागेल असंही त्यांनी म्हटलं.वसुंधरा राजेंसह या कार्यक्रमात देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

Published by: Suraj Yadav
First published: November 15, 2019, 11:41 AM IST

ताज्या बातम्या