नवी दिल्ली 26 जानेवारी : भाजपचे खासदार आणि राहुल गांधी यांचे चुलत भाऊ वरुण गांधी सध्या भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षात फारसं महत्त्व मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढत जातेय. त्यामुळे वरुण हे गेली काही वर्ष भाजपमध्ये फारसे सक्रीय दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. त्यामुळे नाराज असलेले वरुण गांधी भाजपला धक्का देत काँग्रेसचा हात पकडण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशात त्यामुळे फायदा काँग्रेला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेस आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असून वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लखनऊमध्ये 10 फेब्रुवारीला काँग्रेसची मोठी रॅली आहे. त्यात प्रियांका पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहे. याचवेळी वरुण गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वरुण काँग्रेसमध्ये आला तर उत्तर प्रदेशात त्याचा फायदा होऊ शकतो असं राहुल गांधी यांना वाटतं.
संजय गांधी यांच्या निधनानंतर मनेका गांधी आणि इंदिरा गांधी यांचं फारसं जमलं नाही. त्यावेळी वरुण हे फक्त चार महिन्यांचे होते. नंतर सोनिया गांधी यांच्याशीही मनेका गांधींचं फारसं पटलं नाही. नंतर मनेकांनी स्वतंत्रपणे आपली वाट निवडली. सुरुवातीला जनता दल आणि नंतर त्या भाजपवासी झाल्या. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही त्या मंत्री होत्या आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना मंत्रीपदावर आहेत.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत वरुण हे भाजपचे स्टार प्रचारक होते. मात्र त्यांनी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका करणार नाही असं म्हटलं होतं. आता वरुण आणि राहुल आणि प्रियांका या भावडांमध्ये पूर्वीसारखी कटुताही राहिलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी यांनी काँग्रेसचा हात धरला तर ती राजकारणातली मोठी घटना ठरणार आहे.