News18 Lokmat

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज करणार दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 07:11 AM IST

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज करणार दाखल

लखनौ, 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा क्षण 'न भूतो न भविष्यति' ठरवण्यासाठी भाजप नेत्यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण दिलं आहे. यानुसार एनडीएतील अनेक दिग्गज नेते वाराणसीत दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींसोबत उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2014मध्ये एनडीएकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यानं नितीश कुमार नाराज होऊन एनडीएतून बाहेर पडले होते. एवढंच नाही तर त्यांनी नरेंद्र मोदींविरोधात प्रचारदेखील केला होता. पण 2018 मध्ये राजद आणि जदयूच्या आघाडीमध्ये फूट पडली आणि नितीश कुमार एनडीएमध्ये सहभागी झाले. यापूर्वी कोणत्याही निवडणुकीदरम्यान नितीश कुमार मोदींसोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना सहभागी झालेले नाहीत.

NDAचे नेते राहणार उपस्थित

नितीश कुमार यांच्याव्यतिरिक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादलदेखील वाराणसीत दाखल होणार आहेत. तसंच भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि भाजपतील अनेक बडे नेतेदेखील पंतप्रधान मोदींसोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

रोड शोद्वारे केलं शक्तीप्रदर्शन

दरम्यान, गुरुवारी (25 एप्रिल)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोदींनी रोड शोला सुरुवात केली. रोड शोनंतर नरेंद्र मोदींनी गंगा आरतीदेखील केली.

SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...