कोरोना रुग्णांचा देवदूत! बाधितांना थेट घरी जेवण पोहोचवणार बडोद्यातील हा व्यक्ती

कोरोना रुग्णांचा देवदूत! बाधितांना थेट घरी जेवण पोहोचवणार बडोद्यातील हा व्यक्ती

कोरोनाच्या महामारीत प्रत्येकानेच आपआपल्या परीने मदतीचा प्रयत्न केला.

  • Share this:

बडोदा, 16 एप्रिल : कठीण समय येता कोण कामास येतो?असा प्रश्न अनेकदा विचारला जातो, पण कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही संपूर्ण भारतात लक्षावधी निस्वार्थी हात पुढे आले आणि गरजूंना मदत केली. कुणी कमी पैशांत जेवण दिलं तर कुणी शिधा दिला. प्रत्येकानेच आपआपल्या परीने मदतीचा प्रयत्न केला. असंच एक उदाहरण गुजरातमधल्या बडोद्यातून पुढे आलं आहे. बडोद्यातील शुभल शहा यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे की कोरोनाबाधित रुग्णांना आम्ही स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचं अन्न मोफत घरपोच देऊ.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय,‘या कोविड संकटात आम्ही तुमच्यासोबत आहोत. जर तुमच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली असेल तर आम्ही स्वच्छ असं दुपारचं आणि रात्रीचं जेवण तुमच्या घराच्या दारांत पोहोचवू, क्वारन्टाइनचा काळ संपेपर्यंत ही सेवा मोफत असेल. आम्हाला नाव, प्रसिद्धी किंवा फोटो प्रसिद्ध करण्याची इच्छा नाही. कृपया थेट मेसेज(DM Direct Messaging)करावा.

शहा यांच्या या आवाहनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना या कामात मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्याचबरोबर निस्वार्थपणे सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं कौतुकही अनेकांनी केलं आहे.

एकानी म्हटलंय,‘तुम्ही खूप महान कार्य करताय. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा.’एकीने लिहिलंय,‘माझे आई-वडील बडोद्यातच राहतात त्यांना गरज भासल्यास कुणाकडे तरी (तुमच्याकडे) मदत मागता येईल अशी आशा निर्माण झाली आहे.’‘मानवतेवरील विश्वास पुन्हा स्थापित केल्याबद्दल धन्यवाद,’असं एकाने म्हटलं आहे.

शहा यांच्याप्रमाणेच अनेकांनी कोविड काळात जनासामान्यांना मदत केली आहे. हैदराबादेतील रामु दोसापट्टी यांनी 24 तास राइस एटीएम ही सेवा सुरू केली आहे. यामार्फत त्यांनी गरजूंना शिधा उपलब्ध करून दिला होता, त्यात तांदुळ आणि इतर वाणसामान देण्यात आलं होतं. रामू यांना मदत करण्यासाठी अनेकांनी त्यांच्यासोबत काम सुरू केलं.

तामिळनाडूतील त्रिचीमध्ये पुष्पराणी सी आणि त्यांचे पती चंद्रशेखर यांनी 50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यातून एक अन्नपदार्थांची छोटी टपरी सुरू केली होती. त्यातून ते 1 रुपयांत लोकांना अन्नपदार्थ देत होते. या जोडप्याने त्यांच्या परीने प्रयत्न सुरू केले होते. आता देशभर असे अनेक जण पुढे येत आहेत आणि समाजाला मदत करण्यास हातभार लावत आहेत.

First published: April 16, 2021, 4:36 PM IST

ताज्या बातम्या