डेहराडून 28 मार्च : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. या काळात कुणीही घराबाहेर पडू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं होत. याविषयी थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर देशाला ते अतिशय महागात पडेल असंही ते म्हणाले होते. जे लोक जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनंतरही उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी लॉकडाउनमध्ये सुट देण्याचा निर्णय जाहीर केला. 31 मार्चला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही सुट असेल असंही ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाला रोखायचं असेल तर गर्दी टाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दिल्लीत आणि मोठ्या शहरांमध्ये काम करणारे उत्तर प्रदेशमधले कामगार मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतत आहेत. सध्या बसेस आणि रेल्वे बंद असल्याने त्यांना जाण्याची काहीही सोय नाही. ते अडकून पडले असून रस्त्यांवरून लोकांचे जत्थे पायीच निघाले आहे.
त्यामुळे या लोकांची सोय व्हावी यासाठी ही सुट देण्यात येत असल्याचं रावत यांचं म्हणणं आहे. पण त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता होती ती या व्हायरची समाजात पसरण्याची. त्यालाच कम्युनिटी लागण असंही म्हटलं जातं. ती अतिशय गंभीर अशी परिस्थिती असते. त्याचे संकेत आता मिळू लगाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून त्याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट पणे सांगितलं गेलं नाही. मात्र काही आकडेवारीवरून याचा अंदाज येवू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
श्वास घ्यायला ज्यांना त्रास होत आहे अशा 110 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातल्या 12 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हे सर्व असे लोक आहेत ज्यांची विदेशात गेल्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. किंवा ज्यांना लागण झाली अशा लोकांच्या थेट संपर्कात हे लोक आलेले नव्हते. त्यामुळे कोरोनाने आता समाजात हातपाय पसरायला सुरुवात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही तज्ज्ञांचं मत आहे.
सरकार आणि प्रशासनाकडून लोकांना आपल्या घरामध्येच थांबण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. कारण कोरोना अतिशय झपाट्याने पसरतो असं जगभरात दिसून आलं आहे. पण कम्युनिटी लागण झाली हे आत्ताच सांगता येणार नाही असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.