लखनऊ 05 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, लखीमपूर खीरी (Lakhimpur Violence) येथे शेतकरी आंदोलनादरम्यान वेगळंच चित्र पाहायला मिळालं. याठिकाणी झालेल्या दंग्यात 8 जणांचा मृत्यू झाला. आपल्या बचावासाठी भाजप मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचं म्हटलं जात होतं. आता या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आला आहे (Exclusive Video of Lakhimpur Kheri Incident). या घटनेचा पुरावा देणारा हा व्हिडिओ न्यूज १८ च्या हाती लागला आहे.
या व्हिडिओमध्ये एक SUV गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली गेल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गाडी कोण चालवत आहे, हे स्पष्ट दिसत नाहीये. या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतं, की काही शेतकरी रस्त्यावरुन चाललेले आहेत. इतक्यात मागून एक काळ्या आणि मिलिट्री रंगाची SUV येते आणि शेतकऱ्यांना मागून धडक देत पुढे निघू लागते. यात एक वयोवृद्ध शेतकरी दाडीच्या बोनटवर पडताना स्पष्ट दिसतो. हा व्हिडिओ फार स्पष्ट नाही. मात्र, ज्या पद्धतीनं ही गाडी पुढे जाते ते पाहून जाणवतं की शेतकऱ्यांनी चिरडून ती पुढे गेली आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडतो. काही लोक मागे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचं दिसतं. इतक्यात मागून काळ्या रंगाची आणखी एक SUV येते आणि वेगात पुढे जाते.
New Video emerges of #Lakhimpur - the THAR Vehicle can be seen here pic.twitter.com/BszSojmBIW
— Aman Sharma (@AmanKayamHai_) October 5, 2021
लखीमपूर खीरी येथे दोन दिवस झालेल्या गोंधळानंतर शेतकरी आणि प्रशासनामध्ये चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला आहे. यानुसार, 4 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 -45 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त जजकडून या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल. मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. यासोबत आठ दिवसाच्या आत आरोपींना अटक करण्यात येईल, असं आश्वासनही सरकारनं दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest, Uttar pradesh