अयोध्या 18 जुलै : उत्तर प्रदेशातल्या एका घटनेने स्वच्छता अभियानाच्या नावाखाली काय केलं जातं हे उघड झालंय. अयोध्ये जवळच्या एका गावात शाळेच्या मुख्याध्यापिका स्वच्छता अभियानाच्या नावाखाली टॉयलेटची मुलांकडून स्वच्छता करून घेत असल्याचं उघड झालंय. या प्रकाराची तक्रार मुलांच्या पालकांनी करताच त्या तीन मुलांची नावंच शाळेतून काढून टाकलं आल्याचं उघड झाल्याने खळबळ उडालीय. या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी करावी अशी मागणी आता करण्यात येतेय.
अयोध्येजवळच्या सोहावल भागात पिलखावा प्रार्थमिक शाळा आहे. ही शाळा आदर्श म्हणून ओळखली जाते. स्वच्छता अभियानाच्या नावाखाली शाळेतल्या छोट्या मुलांकडून टॉयलेट्स स्वच्छ करून घेत असल्याचं स्पष्ट झालंय. या बदल्यात मुलांना या मुख्याध्यापिका 5 रुपये देत होत्या.
असा झाला प्रकार उघड
मुलं घरी पैसे घेऊन येत असल्याने पालकांनी त्यांना त्याबाबत विचारलं. तेव्हा मुलांनी सांगितलं की शाळेत टॉयलेट स्वच्छ करण्याचा मोबदला म्हणून त्यांना मुख्याध्यापिकेनं हे पैसे दिले आहेत. मुलांचं हे उत्तर ऐकून पालकांना धक्काच बसला. तीन मुलांच्या पालकांनी याबाबत शाळेत तक्रार केली. शाळेतल्या आवाराची स्वच्छता करणं, वर्गात झाडू मारणं मान्य आहे, मात्र मुलांकडून टॉयलेट्स साफ करणं योग्य आहे का? अशी तक्रार त्यांनी शाळेकडे केली.
तेव्हा त्यांना न्याय न देता त्या तीन मुलांचीच नावं शाळेतून काढून टाकण्यात आलीत. यातले दोन मुलं ही पाचवीत तर एक मुलगा तिसऱ्या वर्गात आहे. राज्य सरकार सर्व शिक्षाअभियान राबवत असताना शाळेचे शिक्षकच असं करत असतील तर मुलांचं काय होणार असा प्रश्न पालकांनी विचारलाय. असं काम करवून घेणाऱ्या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी करा अशी मागणीही पालकांनी केलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा