अयोध्या, 14 जून : उत्तर प्रदेशातलं महत्त्वाचं धार्मिक स्थान असणाऱ्या अयोध्येत दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याचा अलर्ट सुरक्षा दलांनी दिलाय. या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अयोध्येतली सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्या हे राज्यातलं सर्वात संवेदनशील शहर असल्याने सुरक्षा दलं खास काळजी घेत आहेत. शहरातल्या सर्व मार्गावर गस्तही वाढविण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सर्व खासदारांसह 16 जूनला अयोध्येला जाणार आहेत.
नेपाळच्या मार्गाने काही दहशतवादी राज्यात घुसले असून तेच दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांना मिळाली होती. 2005मध्ये अयोध्येत वादग्रस्त ठिकाणी हल्ला झाला होता. त्यातल्या आरोपींना 18 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची योजना असू शकते अशी भीतीही व्यक्त करण्यात येतेय.
खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वांच्या मंदिरांचा परिसर, राम जन्मभूमी मंदिर, विविध धर्मशाळा, हॉटेल्स आणि रेल्वे स्थानक परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय. याच महिन्यात विविध महत्त्वाच्या व्यक्ती अयोध्येत येणार असल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येत
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जूनला अयोध्यला भेट देणार आहेत. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांना घेऊन ते अयोध्येत रामाचं दर्शन घेणार आहेत. निवडणुकीच्या आधी ते सहकुटुंब अयोध्येत आले होते. निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं. त्यामुळे देवाचे आभार माण्यासाठी उद्धव अयोध्येत जात असल्याचं सेनेने म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधीही दौरा
याआधी उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबर 2018 रोजी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडे मागणी लावून धरली होती. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकेरंनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता.संतांच्या आशिर्वादाशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले. भारतच नाही तर परदेशातले हिंदूधर्मीय राम मंदिराची वाट पाहत आहेत. त्यामुळे राम मंदिर झालंच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
अमित शहांना दिला प्रस्ताव
राम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य आणि माजी खासदार डॉक्टर रामविलास दास वेदांची यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनी आपल्या नव्या खासदारांना घेऊन अयोध्येला यावं आणि रामलल्लांचं दर्शन घ्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.