प्रयागराज 24 फेब्रुवारी : प्रयागराज इथं कुंभात स्नानासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका कामाने नवा आदर्श घालून दिला. गंगेत स्नान केल्यानंतर त्यांनी गंगेची पूजा आणि आरती केली. यावेळी कुंभ मेळ्यात स्वच्छतेची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जगभर त्याचं कौतुक होतंय. त्यामुळं पंतप्रधानांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, त्यांना चरणवंदन केलं आणि त्यांचा सत्कारही केला.
चार पुरुष आणि दोन महिला कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी पाय धुतले आणि अभिवादन करत त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या या कृतीने सर्व कर्मचारी भारावून गेले होते. नंतर झालेल्या जाहीर सभेतही पंतप्रधानांनी कुंभात स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांच्या कामामुळेच कुंभ दिव्य आणि भव्य झाल्याचं ते म्हणाले.
#WATCH: Prime Minister Narendra Modi washes feet of sanitation workers in Prayagraj pic.twitter.com/otTUJpqynU
— ANI UP (@ANINewsUP) February 24, 2019
कुंभात स्नान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज इथं त्रिवेणी संगमानत स्नान केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यानंतर स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ त्यांनी केला. त्यानंतर गोरखपूरला त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज इथं गेले. त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं आणि गंगापूजन करत आरतीही केली.
या आधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1954मध्ये कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केलं होतं. दिव्य कुंभ, भव्य कुंभ हे यावेळच्या मेळ्याचं घोषवाक्य होतं. केंद्र आणि राज्य सरकारने जगभरातल्या भारतीयांना कुंभ मेळ्यात सहभागी होता यावं यासाठी खास प्रयत्न केले होते.
परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हि.के. सिंग यांनी अनिवासी भारतीयांसोबत हजर राहून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवलं होतं. या वेळच्या अनिवासी भारतीय परिषदेचं दिल्लीत नाही तर वाराणशीत आयोजन करण्यात आलं होतं. कुंभ हा सर्व जगाला सांस्कृतिक धाग्यात जोडणारा दुवा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. स्वच्छता आणि व्यवस्थापनाची यावेळी सरकारने अतिशय चांगली व्यवस्था केली होती.