मुंबई, 18 मे : ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनवर बोलणं टाळा असं आवाहन वाहतूक विभागाकडून वारंवार केलं जातं. मात्र ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनवर बोलणं बेकायदेशीर नसल्याचा निर्णय केरळ उच्च न्यायालयानं दिलाय. जोपर्यंत ड्रायव्हिंग करताना मोबाईलच्या वापरामुळं चालकाची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही असं केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलंय.
कोच्ची येथील रहिवासी संतोष एम जे या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निष्कर्ष काढला आहे. मोटर वाहन अधिनियमामध्ये मोबाईल फोनचा उल्लेख नसल्याचंही केरळ उच्च न्यायालयानं निदर्शनास आणून दिलंय.
संतोष यांच्यावर पोलिसांनी ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असल्याने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने कोणताही दंड वसूल न करता प्रकरण निकाली काढलं. तसंच जोपर्यंत लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं सांगितलं आहे.
1988 मोटर वाहन अधिनियममध्ये नमूद करण्यात आलं आहे की, जर कोणी लोकांच्या सुरक्षेला धोका असेल अशा पद्धतीने ड्रायव्हिंग करत असेल, मग ती कोणतीही परिस्थिती असो ते दंडनीय आहे. त्यासाठी दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र यामध्ये कुठेही मोबाइल फोनच्या वापराबद्दल नमूद करण्यात आलेलं नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा