मुंबई, 20 एप्रिल : प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी खरंच फक्त मथुरेत झालेल्या गैरवर्तणुकीमुळे पक्षाला राम राम केला का? प्रश्न विचारला जात आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी न दिल्यानं पक्ष सोडल्यांच म्हटलं जात आहे.
शिवबंधनात अडकलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनी 19 जून 2015 मध्ये एक ट्विट केलं होतं की, एखादी व्यक्ती कसं काय सकाळी उठून अचानक विचारधारा बदलू शकतो जसे की कपडे बदलावे. आता त्यांचे हेच ट्वीट लोकांनी टीका करण्यासाठी वापरलं आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर याच ट्वीटचा आधार घेत हल्लाबोल केला जात आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं की, मला कल्पना आहे लोक प्रश्न विचारतील. माझ्या निर्णयाने अनेकजण नाराजही होतील. पण हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे.
चतुर्वेदी यांच्यासोबत काम केलेल्या लोकांच्या मते त्या महत्त्वकांक्षी आहेत. मुंबईत जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या प्रियांका यांनी 2010 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर दोनच वर्षांत उत्तर-पश्चिम मुंबईच्या युवक काँग्रेसची महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर पक्षात वेगवेगळ्या पदांवर काम करत त्या महासचिवही झाल्या.
काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, प्रियांका यांच्या पक्षाकडून अपेक्षा वाढत गेल्या. त्या पूर्ण होत नसल्याचे दिसताच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं राजीनाम्यातून दिसतं.
प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्ष महिला अधिकाऱ्यांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. त्या स्वत: महिलांच्या सबलीकरणासाठी आणि हक्कांसाठी लढल्या आहेत.
याशिवाय मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना तिकिट दिल्याने प्रियांका नाराज दिसल्या. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर देवाशीष जरारिया यांना दिलेली उमेदवारीही खटकल्याचे समजते. जरारिया नोव्हेंबर 2018 मध्ये बसपामधून काँग्रेस प्रवेश केला होता. पक्षात आल्यानंतर लगेच उमेदवारी देणं त्यांना आवडलं नव्हतं.
गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या संपर्कात होत्या अशीही चर्चा होत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रियांका यांना संधीसाधू म्हटलं आहे. तर प्रियांका यांनी शिवसेनेत जाणं ही काँग्रेसची मोठी हानी असल्याचंही नेत्यांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, खोतकरांच्या वक्तव्याने प्रचारसभेत हशा