भारत-पाकिस्तानच्या मध्ये सर्वात धोकादायक सीमारेषा, अशी आहे तिची सुरक्षा व्यवस्था

भारत-पाकिस्तानच्या मध्ये सर्वात धोकादायक सीमारेषा, अशी आहे तिची सुरक्षा व्यवस्था

भारत-पाकिस्तानच्या मधली जी सीमारेषा आहे ती सर्वात संवेदनशील आणि धोकादायक सीमा आहे. भारतानं सीमेवर काय काळजी घेतलीय ते पाहुया.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत-पाकिस्तानच्या मधली जी सीमारेषा आहे ती सर्वात संवेदनशील आणि धोकादायक सीमा आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला. त्यामुळे सीमेवर चोख बंदोबस्त ठेवणं महत्त्वाचं ठरतं. भारत सतर्क आहे. लष्कर, वायुसेना सर्वजण लक्ष ठेवून आहेतच. पण भारतानं सीमेवर काय काळजी घेतलीय ते पाहुया.

दोन्ही देशांमध्ये चार राज्यांमध्ये ही सीमारेषा आहे. काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये जवळजवळ 3300 किमी सीमा आहे. त्यावर भारत नाइट व्हिजन डिव्हाइस, लांबवरची रेकी प्रणाली आणि पेट्रोलिंग याद्वारे भारत पाकिस्तानावर नजर ठेवून असतो. सीमेवरची घुसखोरी थांबवण्यासाठी भारत सीमेवर कुंपण लावतंय. लाइट्स लावले जातायत. त्यामुळे रात्रीही दिवसासारखा उजेड सीमेवर असेल.

लोकसभेत गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर सीमेवरच्या सुरक्षेची माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये 185.938 किलोमीटर कुंपण लावण्याचं काम पूर्ण झालंय. शिवाय प्रखर दिवे लावण्याचं कामही पूर्ण झालंय.

गुजरातमध्ये भारत-पाकिस्तान सीमा एकूण 508 किमी आहे. तिथे 340 किमी कुंपण तयार करता येतं. यात 280 किमी कुंपण पूर्ण झालंय. उरलेलं 60 किमी मार्च 2020पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. 168 किमी सीमा कुंपणासाठी योग्य नाही. तिथे बीएसएफद्वारा पेट्रोलिंग, 24 तास पाहणी तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलं जातंय.

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

राजस्थानात सीमेवरील 90 किमी परिसरात हाय अलर्ट, पाकने तैनात केले सैन्य

First published: February 27, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या