नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.
सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा भारत पाकिस्तानवर बाँब टाकत होता तेव्हा पंतप्रधान या सर्व घटनांवर नजर ठेवून होते. हल्ल्याच्या पूर्ण रात्रभर मोदी झोपले नाहीत. सर्व कारवाईवर त्यांची नजर होती. जेव्हा पायलटसहित सर्व विमानं सुखरूप परतली, तेव्हा पंतप्रधानांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ( 26 फेब्रुवारी ) सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सुरक्षेसंबंधी ही बैठक होती. यानंतर राष्ट्रपती भवनात गांधी शांती पुरस्कार कार्यक्रमात सामील झाले. नंतर राजस्थानमध्ये सभेला संबोधलं. त्यानंतर दिल्लीत येऊन मेट्रोमधून इस्काॅन टेंपलला जाऊन जगातल्या सर्वात मोठ्या भगवद्गीतेचं उद्घाटन केलं. पूर्ण दिवस पंतप्रधान व्यस्त होते.
दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.
भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.
बालाकोटचं सत्य लपवतोय पाकिस्तान, पण समोर आले हे PHOTOS