हट्टीपणाची हद्द झाली!; लग्नातलं जेवण आवडलं नाही म्हणून वऱ्हाड नवरीशिवाय परतले
उत्तर प्रदेशातील (UP) एका लग्नात ((Wedding Ceremony) जेवण न आवडल्याचा वाद विकोपाला गेला. दोन्हीकडची मंडळींनी माघार घेण्यास नकार दिल्याने अखेर नवरीशिवाय वरात घरी परतली.
लखनौ, 7 डिसेंबर: लग्न समारंभात (Wedding Ceremony) नातेवाईकांचे मानापमान नाट्य ही एक मोठी डोकेदुखी असते. शुल्लक वादाचे रुपांतर नंतर मोठ्या भांडणात होते, आणि आनंदावर विरजण पडते. नातेवाईंकाच्या प्रतिष्ठेसाठी लग्न मोडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. नवरा मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडले नाही, म्हणून लग्न मोडल्याची एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशातील (UP) एका लग्नातील हा प्रकार आहे. या लग्नात नवरा मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडले नाही. पोलीस स्टेशनमध्येही मध्यस्थीचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने अखेर वऱ्हाड नवरी मुलीशिवाय घरी परतले. हा संपूर्ण प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमध्ये सिंकदपूर कोटा या गावातून वऱ्हाड आले होते. लग्नाचे बहुतेक विधी पूर्ण झाले होते. दोन्हीकडच्या मंडळींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. त्यावेळी अचानक जेवणाच्या पंक्तीमध्ये वादाची ठिणगी पडली.
नवऱ्या मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडलं नाही, त्याने मुलीकडच्या मंडळींसमोर जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर मुलीच्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. दोन्हीकडील मंडळींमध्ये जोरदार वाद झाला.
मुलीकडच्या मंडळींनी या प्रकरणात पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यात यश मिळाले नाही. मुलीकडच्या मंडळींनी लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलाकडील वऱ्हाडी मंडळी नवरीमुलीशिवाय घरी परतली.