'सरपंच' होण्यासाठी कायपण! निवडणूक जिंकण्यासाठी त्याने आणली 'सौभाग्यवती'

'सरपंच' होण्यासाठी कायपण! निवडणूक जिंकण्यासाठी त्याने आणली 'सौभाग्यवती'

निवडणूक जिंकण्यासाठी (Village Panchayat Election) उमेदवार काहीही करू शकतात, हे आपण अनेकवेळा पाहिलं आहे. गावचा सरपंच होण्यासाठी एका इच्छुकाने चक्क लग्न केलं, तेपण फक्त वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला म्हणून.

  • Share this:

बल्लिया (उत्तर प्रदेश), 2 एप्रिल : निवडणुकीतल्या आरक्षणामुळे महिलांना पदावर येण्याचा अधिकार मिळाला खरा; पण एखाद्या गावाची सरपंच महिला झाली, तर तिचा पतीच पडद्यामागून सूत्रं हलवत असतो, असं समाजाच्या पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. आता हळूहळू हे चित्र बदलायला लागलं आहे, तरीही ग्रामीण भागात मात्र हीच परिस्थिती दिसते. जयपूरजवळच्या सोडा गावची सरपंच झालेली छवी राजावत (Chhavi Rajawat) ही एमबीए झालेली तरुणी याला अपवाद. असे काही अपवाद अन्य ठिकाणीही आहेत, पण ते अगदीच थोडे. या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) एक घटनेनं याच मुद्द्याचं दुसरं रूप समोर आणलं आहे.

बल्लिया (Ballia) जिल्ह्यातल्या करन छापरा (Karan Chhapara) गावातल्या हाथीसिंह (Haathi Singh) या 45 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्याने (Social Worker) नुकताच विवाह केला आहे. अविवाहित राहायचं ठरवलेलं असतानाही त्याने अचानक हा निर्णय घेऊन विवाह केलाही. त्यामागचं कारण ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्यच वाटेल.

गावाचं सरपंचपद मिळावं, अशी हाथीसिंह याची प्रबळ इच्छा आहे. त्यापूर्वी 10 वर्षांपासून तो सामाजिक कार्य करतो आहे. 2015मध्ये त्याने सरपंचपदाची निवडणूक (Village Panchayat Election) लढवली; पण त्याला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. म्हणून यंदा त्याने पुन्हा निवडणूक लढवायचं ठरवलं होतं; मात्र त्याचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे सरपंच होण्याचं त्याचं स्वप्न या वेळीही भंगलं, पण त्याच्या समर्थकांनी त्याला एक वेगळाच उपाय सुचवला आणि तो त्याला पटलाही. त्याने विवाह केला, तर पत्नीला निवडणुकीला उभं करता येईल आणि सरपंचपद मिळालं, तर निदान ते घरात तरी राहील, असं त्यांनी सुचवलं. म्हणून हाथीसिंहने विवाह न करण्याची आपली प्रतिज्ञा मोडली आणि विवाह करायचं ठरवलं.

हिंदू प्रथेनुसार खर मास सुरू असून, त्यात विवाहासारखे पवित्र विधी केले जात नाहीत; मात्र निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 13 एप्रिलपर्यंतच असल्याने विवाह त्याआधीच होणं गरजेचं होतं. त्यामुळे 26 मार्चला त्या दाम्पत्याचा विवाह गावातल्या धर्मनाथजी मंदिरात पार पडला. हाथीसिंह यांची पत्नी ग्रॅज्युएशन करत असून, आता ग्रामपंचायत निवडणुकीची तयारीही करत आहे.

'गेल्या पाच वर्षांपासून मी खूप काम करत आहे. माझे समर्थक आमच्यासाठी प्रचार करत आहेत. माझ्या समर्थकांमुळेच मी माझा कधीच विवाह न करण्याचा निर्णय बदलायचं ठरवलं. माझी आई 80 वर्षांची असून, तीही तिच्या आयुष्यात निवडणूक लढू शकली नव्हती,' असं हाथीसिंह यांनी सांगितलं. आता हाथीसिंह यांची नववधू निवडून येते का, निवडून आली तर सरपंच होते का आणि सरपंच झाली तर स्वतःच्या बुद्धीने कारभार करते का, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: April 2, 2021, 7:35 AM IST

ताज्या बातम्या