लखनऊ 31 ऑक्टोबर: Love-Jihadवरून देशात कायम चर्चा सुरू असते. अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालानंतर त्या चर्चेने आणखी जोर पकडला आहे. या मुद्यावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट इशारा दिला आहे. आपली ओळख लपवून मुलींच्या चारित्र्याशी खेळ केलात तर थेट ‘राम नाम सत्य’ची यात्राच निघेल असा इशाराच त्यांनी दिला. योगी यांच्या या इशाऱ्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची काही प्रकरणं समोर आल्याचं काही संघटनांकडून सांगितलं जात आहे. तर असा काही प्रकारच नसतो असं दुसऱ्या गटाकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अहालाबाद हायकोर्टाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निकाल दिला होता. त्याचा संदर्भ देत जौनपूर इथल्या सभेत आदित्यनाथ यांनी हा थेट इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात पोलीस हे आरोपींचं थेट एन्काउंटरच करत असल्याचे आरोप होत आहेत. असे आरोप होत असतानाच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगींनी हा इशारा दिला आहे. लव्ह जिहाद बंद करण्यासाठी उत्तर प्रदेशात कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
#WATCH Allahabad HC said religious conversion isn't necessary for marriage. Govt will also work to curb 'Love-Jihad', we'll make a law. I warn those who conceal identity & play with our sisters' respect, if you don't mend your ways your 'Ram naam satya' journey will begin: UP CM pic.twitter.com/7Ddhz15inS
— ANI UP (@ANINewsUP) October 31, 2020
अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) शुक्रवारी महत्त्वाचा निकाल दिला होता. केवळ लग्न (Marriage) करण्यासाठी धर्मांतर करणं हे वैध नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं.
उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका जोडप्याने आंतरधर्मिय विवाह केला होता. या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे कुटुंबियांना आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापासून रोखा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी कोर्टात दाखल केली. पण या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत कोर्टाने याचिका फेटाळली होती.
न्यायमूर्ती एम.सी, त्रिपाठी यांनी हा आदेश दिला आहे. एका मुस्लिम मुलीने 29 जून 2020रोजी हिंदू धर्म स्वीकारला होता. महिनाभरानंतर 31 जुलैला तिने हिंदु मुलासोबत लग्न केलं होतं. यावरून फक्त लग्न करण्यासाठीच धर्मांतर केल्याचं स्पष्ट होते असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
यासाठी कोर्टाने नूर जहां बेगम प्रकरणाचा हवाला दिला. यात कोर्टाने फक्त लग्न करण्यासाठी धर्मांतर करणं मान्य नसल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणात हिंदू मुलीने धर्म परिवर्तन करून मुस्लिम मुलाशी लग्न केलं होतं. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने असं धर्मपरिवर्तन वैध नसल्याचं म्हटलं होतं.
कोर्टाने कुराणातल्या हादीसचं उल्लेख करत असं मत नोंदवलं होतं की, इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही. कोर्टाचा हा निर्णय दूरगामी परिवर्तन करणारा ठरू शकतो.