नोएडा, 18 डिसेंबर : शाहजहांपुर जिल्ह्यामध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथे मूल होत नसलेल्या एका दाम्पत्याने गायीचं वासरू दत्तक घेतलं आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे नव्या मुलाच्या जन्मानंतर घरात कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, त्याच प्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या दाम्पत्याने वासराला आपल्या मुलाच्या रुपात स्वीकार केला आहे. त्याचं नाव लाल्टू ठेवलं आहे. विजयपाल आणि राजेश्वरी देवी यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली. मात्र आतापर्यंत त्यांना एकही मूल झालं नाही. विजयपाल यांनी सांगितलं की, आम्ही लाल्टूवर नेहमीच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. त्याच्या जन्मापासून तो इथेच आहे. आमच्यासाठी लाल्टूचं प्रेम खरं आणि कोणत्याही अटींशिवाय आहे. ते म्हणाले की, लाल्टूच्या आईचं (गाय) त्यांच्या वडिलांनी पालन केलं होतं. गायीचा मृत्यू झाल्यानंतर वासरू अनाथ झालं. यामुळे आम्ही त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकार करण्याचं ठरवलं.
ते म्हणाले की जर एका गायीला आपण आईच्या स्वरुपात जीव लावू शकतो, तर मग वासऱ्याला मूल का मानू शकत नाही? स्थानिक गावकरी या प्रकारानंतर आनंदित आहे, त्याबरोबरच ते आश्चर्यचकितही झाले आहे. जेव्हा त्यांना याबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर खूप लोक या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमात सामील झालेल्या राम बिहारी यांनी सांगितलं की, आम्ही हे दाम्पत्य आणि वासऱ्यासाठी खूप खूष आहोत. ही चांगली परंपरा आहे. आणि आम्ही आशा करतो की अन्य लोकही याचं अनुकरण करतील. यामुळे माणूस व प्राण्यांमधील संबंध अधिक मजबूत होईल. या सोहळ्यात लाल्टूला भेट म्हणून दूध पिण्याची वाटी, अंथरुण आणि रोख मिळाली आहे.
500 लोक झाले होते सहभागी
दाम्पत्याने बुधवारी वासऱ्यासाठी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यामध्ये 500 हून अधिक पाहूण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या दाम्पत्याने लाल्टूला गोमती नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले व तेथे त्याचा 'मुंडना'चा कार्यक्रम पार पाडला. तसं पाहता प्राणी व माणसांमधील ही जवळीक अनोखी आहे. स्वित्झलँडमध्ये एका शेतकऱ्याने गायला एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता. ही गाय स्विस एल्प्समध्ये एका डोंगरावर चढली होती. यात तिच्या पायाला दुखापत झाली होती. तिला अधिक त्रास होऊ नये यासाठी तिला हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केलं होतं.