नवी दिल्ली, २४ ऑगस्ट- कुख्यात गुंड छोटा शकीलच्या मुलाने अध्यात्माची वाट धरली आहे. याआधी डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही मौलाना झाला. त्यामुळे एकीकडे लोकांवर अन्याय करुन कुख्यात गुंड बनलेले वडील आणि दुसरीकडे या जगापासून दूर अध्यात्माची वाट पकडत आहेत. बाप- लेकांचं हे परस्पर विरोधी चित्र दिसत असल्यामुळे दाऊद आणि शकील यांची गादी कोण चालवणार याचीच उत्सुकता अंडरवर्ल्ड वर्तुळात पाहायला मिळेल यात काही शंका नाही.
ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला खंडणीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर दाऊदचा मुलगा आध्यात्मिक प्रसारासाठी इजेत्तमामध्ये सहभागी झाला. आपला मुलगा मौलवी झाल्याने दाऊदला नैराश्यदेखील आले होते. नैराश्यातून बाहेर यायला दाऊदला बरेच दिवस लागले. पण आता तशीच काहीशी अवस्था छोटा शकीलची झाली आहे. शकीलचा मुलगा कुराण पठणात अव्वल असून त्यानेही अध्यात्माची कास धरली आहे. मुंबई साखळी बॉम्ब हल्ल्यानंतर दाऊद आणि शकील पाकिस्तानात पसार झाले आणि तिथेच स्थायिक झाले. दाऊदच्या कुटुंबात तशी अनेक मुलं आहेत. पण अंडरवर्ल्डचा कारभार सांभाळण्याची एकामध्येही कुवत नाही. छोटा शकीलला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. १८ वर्षांचा एकुलता एक मुलगा मोबाशीर शेखने अध्यात्माची कास धरून वडिलांचा रक्तरंजीत प्रवास खंडीत केला असेच म्हणावे लागेल.
मोबाशीर हा उत्तम कुराण पठण करतो. त्याला संपूर्ण कुराण तोंडपाठ आहे. वडिलांच्या गुन्हेगारी विश्वात त्याला काडीमात्र रस नाही. शकीलच्या दोन्ही मुली विवाहित असून दोघींचेही पती कराचीत डॉक्टर असल्याचे म्हटले जाते. दाऊद आणि छोटा शकीलचे वय झाल्याने दोघंही कराचीतूनच आपला व्यवसाय सांभाळतात. पण भविष्यात हा व्यवसाय कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chota shakeel, Chota shakeel son, Daud ibrahim, Maulana, Underworld don