'...त्यामुळे कमी बोला',अडचणी कमी करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

'...त्यामुळे कमी बोला',अडचणी कमी करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्रपक्ष भाजपला सल्ला दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्रपक्ष भाजपला सल्ला दिला आहे. 'राफेल, मोदी चित्रपटावर बंदी आणि नमो टीव्हीचे प्रसारण थांबविणे या धक्क्यांनंतर भाजपला बुधवारी बसलेला चौथा धक्का महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत राडेबाजीचा होता. अशा हाणामाऱ्यांना फक्त मतभेद म्हणून सोडून देता येणार नाही. निदान राफेलबाबत तरी संयमाने बोलणे गरजेचे आहे. संरक्षणमंत्र्यांपासून सगळेच राफेल प्रकरणाचा निकाल येताच भांबावल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याचाच धोका आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला आहे. बुधवारचे धक्के पचवून उभे राहावे लागेल', अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सामनातून मांडली आहे.

नेमके काय आहे आजचे सामना संपादकीय?

- नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. बंदी कायमची नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी आहे. मोदी यांच्यावरील ‘बायोपिक’ आता प्रदर्शित झाला तर मतदारांवर प्रभाव पडेल असा हल्लाबोल विरोधकांनी केला. हा त्यांचा आक्षेप तसा योग्य नाही. चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी मोदी यांचा प्रभाव आहेच, पण निवडणुकीत अशा चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे हा आदर्श आचारसंहितेचाच भाग आहे.

- चित्रपटाबरोबर अचानक उगवलेल्या ‘नमो’ टीव्हीचे प्रसारणही निवडणूक आयोगाने थांबविले. मोदी यांच्या प्रचारासाठी स्वतंत्र ‘नमो’ टीव्हीची गरज होती की नव्हती हा भाजपचा विषय आहे, पण तसे पाहिले तर एखाद्दुसरे चॅनल वगळता सगळीच चॅनेल्स ही ‘नमो’मय बनली आहेत. मोदी यांची भाषणे व भूमिका अग्रक्रमाने दाखवण्यात येतात.

- भारतीय जनता पक्षाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रभाव आहे व त्याचा फायदा होत असताना ऐन निवडणुकीत ‘मोदी’ चित्रपट प्रदर्शनाचा हट्ट व ‘नमो’ टीव्हीसारखे प्रयोग विरोधकांच्या डोळय़ांत खुपू शकतात हे लक्षात घेतले गेले असते तर बंदीहुकमाची नामुष्की टाळता आली असती.

- जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन जगभरात झाले. ‘ठाकरे’ चित्रपटास निवडणूक आचारसंहितेचा फटका बसू नये व हा चित्रपट फक्त निवडणूक प्रचारासाठी निर्माण केल्याची भावना होऊ नये ही आमची भूमिका होती. त्यामुळेच जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ प्रदर्शित झाला.

- ‘मोदी’ चित्रपटाबाबत हे करता आले असते व विरोधकांना आवरता आले असते, पण ‘चहापेक्षा किटली गरम’ हा प्रकार राजकीय पक्षात असल्याने भक्त आणि समर्थकांमुळे अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आव्हान याचिका स्वीकारणे, ‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीचे प्रसारण थांबविणे या तीन धक्क्यांनंतर भाजपला बसलेला चौथा धक्का महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत राडेबाजीचा होता.

- जळगावचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा सुरू असतानाच भाजपातील दोन प्रबळ गटांत व्यासपीठावरच दंगल झाली. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व भाजपचे जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत व दंगलीत झाले.

- भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने हे सर्व घडले व राडा सोडवायला मध्ये पडलेल्या महाजनांनाही दंगलीचा प्रसाद मिळाला. लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या या राडय़ाचे चित्रण बुधवारी संपूर्ण देशाने पाहिले व ते धक्कादायक होते.

- राजकारणात वाल्यांना घुसवून त्यांचे वाल्मीकी करण्यात आले, पण येथे तर भाजपचे जुनेजाणते तपस्वी वाल्मीकीच वाल्याच्या भूमिकेत शिरून दंगल घडवीत होते. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारास लागलेले हे गालबोट नसले तरी ‘शिस्त’ हाच आत्मा असलेल्या भाजपसारख्या पक्षावर या घटनेनंतर खुलासे करीत बसण्याची वेळ आली आहे. अशा हाणामाऱ्यांना फक्त मतभेद म्हणून सोडून देता येणार नाही.

- लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण म्हणवून घेणे चुकीचे आहे. ‘‘Party with difference’’ असे म्हणणाऱया पक्षाला या हाणामाऱ्यांचे समर्थन करता येणार नाही. सत्तेमुळे शिस्तीचा बिघाडा होऊन काँग्रेसीकरण होणे हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. त्यात ‘मोदी’ चित्रपट, ‘नमो’ टीव्ही व जळगावच्या हाणामारीने अस्वस्थ केले. निदान राफेलबाबत तरी धसमुसळेपणा बंद करून संयमाने बोलणे गरजेचे आहे.

SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 06:49 AM IST

ताज्या बातम्या