'NDAचा विजय पक्का, पवार आणि मायावतींच्या माघारीचे तेच संकेत'

'NDAचा विजय पक्का, पवार आणि मायावतींच्या माघारीचे तेच संकेत'

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का असल्याचा दावा केला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपच्या सर्वेसर्वा यांच्या निवडणुकीतील माघारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ''मायावती यांनीही लोकसभेचे मैदान सोडले आहे. त्यांच्या या माघारीचा परिणाम त्यांच्या व्होट बँकेवरही नक्कीच होईल. शरद पवार लढत नाहीत, मायावती लढणार नाहीत. पंतप्रधानपदाच्या दोन संभाव्य व स्वप्नाळू उमेदवारांनी माघार घेतली यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक जाणवतो. पंतप्रधानपदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का आहे. पवार व मायावतींच्या माघारीचे तेच संकेत आहेत'', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- शरद पवार यांच्या पाठोपाठ मायावती यांनीही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघार नाट्याचे महत्त्व इतकेच की, श्री. पवार व ‘बहन’ मायावती हे दोघे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. निदान पंतप्रधानपदाचे स्वप्न तरी ते पाहत होते, पण पवारांनी माढ्यातून व मायावती यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यात धक्कादायक असे काहीच नाही.

- मायावती यांनी असे सांगितले की, मला देशभरात पक्षाचा प्रचार करायचा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मायावती यांच्या पक्षाची जी काही ताकद आहे ती उत्तर प्रदेशातच. बाकी देशभरात त्यांच्या पक्षाला स्थान नाही. त्यामुळे देशात प्रचार करायचा म्हणून लढायचे नाही ही पळवाट आहे. अशी पळवाट श्री. पवार यांनी माढा मतदारसंघात शोधली. तरुणांना संधी मिळावी यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. आता हे तरुण त्यांच्या घरातच होते व ते मावळ लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

- श्री. पवार हे राष्ट्रीय राजकारणात पुराणपुरुष आहेत. नेहमीप्रमाणे विरोधकांची मोट बांधण्याचे काम ते करीत आहेत, पण स्वतःच्या घरात व पक्षात ते अशी मोट बांधू शकले नाहीत व शेवटी त्यांनाच मैदान सोडावे लागले. एकाच घरातील किती जणांनी लढायचे? हा प्रश्न त्यांनी विचारला, पण माढ्यातून लढायचे त्यांनी आधी पक्के केले व नंतर माघार घेतली. तरुणांसाठीच ही माघार असेल तर मग तरुण नेत्यालाच तेथून आधी उमेदवारी का दिली नाही?

- राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आधीच मंदावले होते. रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या रूपाने निदान घड्याळाचा सेकंद काटा तरी नक्कीच गळून पडला आहे. तिकडे मायावती व इकडे पवारांचे राजकारण असे गर्तेत सापडले आहे. मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीबरोबर युती केली. जागा वाटपही चांगले झाले, पण प्रियंका गांधी यांनी दोघांचा खेळ बिघडवायचे ठरवले आहे.

- मायावती व काँग्रेसची व्होट बँक सारखीच आहे व उत्तर प्रदेशातील आपल्या व्होट बँकेवर मायावती यांचा वचक पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही. जात ही नेत्यांची गुलाम नसते. उत्तरेतील दलित व यादव मतदारांनी 2014 साली मोदी यांना मोठे समर्थन दिले होते व मायावती यांचा एकही खासदार निवडून आला नव्हता.मायावती यांना ही भीती आजही आहे.

- प्रियंका गांधी यांच्या ‘पर्यटन’ दौर्‍यास चांगली प्रसिद्धी व प्रतिसाद मिळत आहे आणि मायावती ज्या मतदारसंघात निवडणूक लढवतील तिथे जाऊन प्रियंका गडबड करतील ही भीती आहेच. मायावती यांनी आतापर्यंत जातीचे गड राखले, पण त्या जात पंचायतीने लोकांचा किती फायदा झाला? कधीकाळी दलित मतदार ही काँग्रेसची मिरासदारी होती व उत्तरेत प्रियंका त्याच व्होट बँकेला काँग्रेसकडे वळवू इच्छित आहेत.

- स.पा.- बसपा आघाडीत काँग्रेसला घेण्यास विरोध करण्यात मायावती यांनी कोणतीही कसर सोडली नाही. मायावती यांना भीती भाजपची नसून काँग्रेसची आहे व आता राहुल गांधींऐवजी प्रियंका उत्तरेत लक्ष घालीत आहेत. मायावती यांनी लोकसभेतून माघार घेण्याचे हे एक कारण असावे. भाजपास बहुमत मिळाले नाही, तर विरोधकांनी दलित महिला म्हणून पंतप्रधान पदासाठी आपणास पाठिंबा द्यावा अशी सुप्त इच्छा मायावती यांच्या मनात उसळी मारत आहे, पण मायावती यांनीही लोकसभेचे मैदान सोडले आहे.

- त्यांच्या या माघारीचा परिणाम त्यांच्या व्होट बँकेवरही नक्कीच होईल. शरद पवार लढत नाहीत, मायावती लढणार नाहीत. पंतप्रधानपदाच्या दोन संभाव्य व स्वप्नाळू उमेदवारांनी माघार घेतली यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक जाणवतो. पंतप्रधानपदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का आहे. पवार व मायावतींच्या माघारीचे तेच संकेत आहेत.

VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'

First Published: Mar 22, 2019 06:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading