हेच तुमच्या लोकशाहीचे 'आदर्श नमुने' मानायचे का? उद्धव ठाकरेंचा जनतेला सवाल

हेच तुमच्या लोकशाहीचे 'आदर्श नमुने' मानायचे का? उद्धव ठाकरेंचा जनतेला सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध घडमोडी घडत आहेत. या घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध घडमोडी घडत आहेत. या घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य करत जनतेला काही प्रश्न विचारले आहेत. 'एकीकडे सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणायचा आणि दुसरीकडे नेते-कार्यकर्त्यांनी परस्परांवर चिखलफेक करायची. नेत्यांवर चप्पल, बूट, शाई, मिरची पूड फेकायची. थप्पड मारण्याचा प्रयत्न करायचा. व्यासपीठावर आपल्याच पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवायचे. त्याचे मोबाईल चित्रीकरण होऊन ते सोशल मीडियावर व्हायरल होईल आणि आपली व आपल्या पक्षाची नाचक्की होईल याचेही भान ठेवायचे नाही. आता तर थेट ईव्हीएम मशीन फोडण्यापर्यंत आणि दिलेले मत सोशल मीडियावरून ‘लाईव्ह’ करण्यापर्यंत मजल गेली आहे. लोकशाहीच्या नावाने असे करणे बरे नाही', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- मतदान चांगले आणि प्रचाराच्या पातळीवर मात्र प्रश्नचिन्ह अशी काहीशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली आहे. निवडणूक प्रचार अटीतटीचाच होणार हे मान्य केले तरी त्याला हमरीतुमरीचे स्वरूप येऊ लागले आहे.

- पक्षापक्षांचे कार्यकर्ते-समर्थक परस्परांना थेट भिडताना दिसत आहेत. त्यातून हाणामारी, लठ्ठालठ्ठी, बूट फेकून मारणे, शाई फेकणे वगैरे प्रकार घडत आहेत. गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या तर एका व्यक्तीने थेट कानशिलात लगावली. नंतर पटेल समर्थकांनी थप्पड मारणाऱया व्यक्तीची धुलाई केली. हा प्रकार का घडला हे तपासात कळेलच, पण कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाला आलेले हे विकृत स्वरूप नक्कीच गंभीर आहे.

- दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रकार घडला. पत्रकार परिषदेत राजकीय नेत्यांवर बूट- चप्पल व शाई फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत जगात सर्वत्रच घडताना दिसत आहेत.

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून हिंदुस्थानातील अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर नेत्यांना ‘बूटफेक’ सहन करावी लागली आहे.

- 2009 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्या दिशेने मध्य प्रदेशात चप्पल फेकण्यात आली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तर चप्पल, बूट, शाई आणि अगदी मिरची पूडही फेकण्याचे ‘प्रयोग’ झाले आहेत.

- 2011 मध्ये लखनौच्या रॅलीत त्यांच्या दिशेने बूट फेकण्यात आला. 2017 मध्ये हरयाणात त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्याआधी 2016 मध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या वर्षी तर दिल्ली सचिवालयात त्यांच्यावर मिरची पूड फेकण्यात आली होती.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही काही वर्षांपूर्वी दिल्लीत एका युवकाने हात उगारण्याचा प्रयत्न केलाच होता. तीन वर्षांपूर्वी एका राजकीय वादाचे पर्यवसान महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती हॉस्टेलमधील शरद पवार यांच्या तसबिरीवर शाई फेकण्यात झाले होते.

- अकोल्यात एका मतदाराने ईव्हीएमला विरोध म्हणून मतदान केंद्रातील ते मशीनच फोडले. मतदान गुप्त ठेवले पाहिजे असा कायदेशीर आणि नैतिक दंडक आहे. तरी एक-दोघांनी त्यांचे मतदान ‘फेसबुक लाईव्ह’ करण्याचा उपद्व्याप केला.

- उत्तर प्रदेशात बसपाच्या एका समर्थकाने चुकून बसपाऐवजी भाजपचे बटण दाबले गेले याचा पश्चात्ताप म्हणून स्वतःचे बोट कापून घेतले. नेत्यांवर बूट, चप्पल, शाई फेकायची, त्यांना थप्पड मारायची, ईव्हीएम मशीन फोडायचे, मतदान ‘लाईव्ह’ करायचे हेच तुमच्या लोकशाहीचे ‘आदर्श नमुने’ मानायचे का? जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत? लोकशाहीच्या नावाने असे करणे बरे नाही. याला लोकशाही म्हणायचे की बेबंदशाही? प्रश्न अनेक आहेत आणि त्यांची उत्तरे जनतेनेच द्यायची आहेत.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

First published: April 20, 2019, 6:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading