भोपाळ, 25 जुलै : सध्या देशात सर्वदूर मान्सूनचं (Monsoon) जोरदार आगमन झालं असल्यामुळे पर्यटकांच्या (Tourists) उत्साहालाही उधाण आलं आहे. मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना ही पिकनिक (Picknik) चांगलीच महागात पडली आहे. नदी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघंही वाहून (carried away) गेले आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
अशी घडली दुर्घटना
मध्यप्रदेशातील ग्वालियरजवळ सिंध आणि पार्वती नद्यांचा संगम होतो. संगमामुळे या ठिकाणी भोवरा तयार होतो. रविवारी दुपारी या ठिकाणी पोहण्यासाठी आणि मजामस्ती करण्यासाठी 8 मित्र आले होते. त्यातील एकाला पोहता येत नव्हतं. मात्र तरीही तो नदीत खोल पाण्यात गेला. पाण्याच्या प्रवाहापुढं आपली ताकद कमी पडत आहे आणि आपल्याला पुन्हा काठाकडे येणं शक्य होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे पाहून त्याच्या एका मित्रानं त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेनं पोहत जायला सुरुवात केली.
पाण्याच्या प्रवाहाचा जोर
मित्राला वाचवण्यासाठी दुसरा मित्र तिथे पोहोचपर्यंत अडकलेला मित्र पाण्यात बुडू लागला होता आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहासोबत वाहत चालला होता. मित्र त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानं आपल्या मित्राचा हातही पकडला. मात्र तोपर्यंत ते इतक्या खोल पाण्यात गेले होते की त्यांना पाण्याचा जोर खेचून नेऊ लागला. दोघांनीही पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पाण्याच्या जोरासमोर त्यांची ताकद कमी पडली आणि दोघंही वाहून गेले.
प्रत्यक्षदर्शींची साक्ष
वाहून गेलेल्या दोन मित्रांचा शोध सुरू आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत या दोघांचा काहीही पत्ता लागलेला नव्हता. हे दोघं एकमेकांचा हात पकडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, असं त्यांच्या तिसऱ्या मित्राने पोलिसांना सांगितलं. मात्र काही वेळच ते दोघे पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकले. काही वेळाने ते पाण्यासोबत वाहत गेले आणि बघता बघता दिसेनासे झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
हे वाचा -पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
काळजी घ्या
पावसाळ्यात सर्व जलप्रवाहांमधील पाण्याचा वेग वाढलेला असतो. त्यात अनेक धरणांमधून विसर्ग होत असल्यामुळे अचानक पाण्याचं प्रमाण वाढतं. अशावेळी पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Rain