मुंबई, 12 फेब्रुवारी : केंद्र सरकार विरुद्ध ट्वीटर (Twitter) यांच्यातील वादामध्ये अखेर ट्वीटरनं माघार घेतल्याची चिन्ह आहेत. दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) नावाखाली हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारनं केली होती. ट्वीटरकडून त्यावर अमंलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर सरकारनं प्रमुख अधिकाऱ्यांना अटक करण्याचा इशारा सरकारनं दिला होता. सरकारच्या या इशाऱ्यानंतर ट्वीटरनं दंगलीला चिथावणी देणारे 97 टक्के अकाऊंट ब्लॉक केली आहेत.
(वाचा : …तर बड्या अधिकाऱ्यांना अटक होणार, केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक)
केंद्र सरकारनं सांगितलेल्या 1435 अकाऊंटपैकी 1398 अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली असल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सहानी (Ajay Prakash Sawhney) आणि ट्वीटर पब्लिक पॉलिसीचे उपाध्यक्ष मोनिक मेचे (Monique Meche) व जिम बेकर (Jim Baker) यांच्यात बुधवारी संध्याकाळी उशीरा बैठक झाली. या बैठकीनंतर ट्वीटरनं कारवाई करण्यास सुरुवात केली. उर्वरित अकाऊंट देखील लवकरच बंद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(वाचा : सावधान! Koo App डाऊनलोड करताय? मग एकदा हे वाचाच )
या विषयावर यापूर्वी झालेल्या बैठकीत ट्वीटरनं सरकारी आदेशाचं पालन करण्यास केलेल्या दिरंगाईबद्दल सरकारनं नाराजी व्यक्त केली होती. भारतामध्ये राज्य घटना सर्वोच्च आहे. कोणतीही जबाबदार संस्था या घटनेचं पालन करेल, अशी आशा सरकारनं व्यक्त केली होती. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर खलिस्तान (Khalistan) आणि पाकिस्तान समर्थित अकाऊंटवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारनं ट्वीटरला (Twitter) दिले होते. सरकारनं सांगितलेल्या सर्व अकाऊंटवर कारवाई करावीच लागेल असा इशारा केंद्र सरकारनं दिल्यानंतर ट्विटरनं आता 97 टक्के अकाऊंट ब्लॉक केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest, Twitter