तिहेरी तलाक कायद्याला विरोध काँग्रेसवर बुमरँग होणार?

तिहेरी तलाक कायद्याला विरोध काँग्रेसवर बुमरँग होणार?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं तिहेरी तलाकच्या मुद्याला हात घातला. पण, काँग्रेसनं दिलेलं अाश्वासन बुमरँग होईल का? असा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं सध्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. मतांसाठी सध्या जाती-पातीच्या राजकारणावर देखील भर दिला जात आहे. यापैकी एक मुद्दा म्हणजे तिहेरी तलाक. सत्ताधारी भाजपनं तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पारित केल्यानंतर त्याला प्रतिक्षा आहे ती राज्यसभेच्या मंजुरीची. पण, आता  'सत्तेत आल्यास तिहेरी तलाक विधेयक रद्द करू' अशी घोषणा काँग्रेसनं केली आहे. त्यामुळे, तिहेरी तलाकच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.  दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या परिषदेत महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी 'काँग्रेस सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करण्याची ग्वाही' दिली. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देखील यावेळी व्यासपीठावर हजर होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिहेरी तलाक मुद्याला काँग्रेसनं हात घातला का? तिहेरी तलाकचा मुद्दा काँग्रेसवर बुमरँग होईल का? असे एक ना अनेक सवाल आता चर्चिले जावू लागले आहेत.

">

यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणाले, ''काँग्रेसचा विरोध हा कायद्याला नाही. तर, त्यातील तरतूदींना आहे. पतीला जेलमध्ये टाकल्यानंतर महिलेला पोटगी कोण देणार? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तीन वर्षे जेलमध्ये टाकल्यानंतर पुढे काय होणार?. हिंदु किंवा इतर धर्मांमध्ये परितक्त्या आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार?'' असे काँग्रेसचे मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, ''मुस्लिम भाजपचे मतदार कधीच नव्हते. त्यांच्यावर मागील चार - पाच वर्षामध्ये विविध मुद्यांवरून हल्ले झाले. त्यामध्ये गोहत्या, लव्ह जिहाद, उत्तर प्रदेशातील अॅन्टी रोमिओ स्कॉडच्या माध्यामातून मुस्लिमांना लक्ष्य केलं गेलं. या साऱ्या गोष्टी पाहून मुस्लिमांमध्ये भीती आहे. त्यामुळे मुस्लिम एकत्र झाले आहेत. शिवाय, त्यामध्ये तिहेरी तलाकचा मुद्दा आलाच. तर, नॉर्थ – ईस्ट भारतामध्ये नागरिकत्वाच्या कायद्यावरून देखील सरकारची दुटप्पी भूमिका दिसून येते. इतर जातीच्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व सरकार देत आहे. पण, मुस्लिमांना मात्र नाही. त्यामुळे देखील मुस्लिमांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा वेळी मुस्लिमांचा वाली म्हणून काँग्रेस पुढे येऊ शकतं. त्याचा फायदा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच होऊ शकेल.'' असं मत त्यांनी व्यक्त केलं.

''तिहेरी तलाकचं समर्थन केव्हाच होऊ शकत नाही. मुस्लिम महिलांना न्याया मिळायला हवा. पण, या मुद्याचं राजकारण होता कामा नये. काँग्रेसनं दिलेल्या आश्वासनाचं स्वागत. पण, त्यानंतर मुस्लिम स्त्रियांना न्याय देखील मिळायला हवा. सध्याच्या प्रस्ताविक विधेयकामुळे मुस्लिम स्त्रियांना समाजामध्ये सन्मान देखील मिळणार नाही. डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत हे प्रकरण जाऊ शकलं असतं. पण या सरकारनं ते केलं नाही.'' असं मत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी 'News18 लोकमत'शी बोलताना व्यक्त केलं.

शहाबानो प्रकरण आणि काँग्रेस

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे आज देखील काँग्रेसला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. या साऱ्या बाबींचा विचार करता तिहेरी तलाकबाबत काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेचा फायदा निवडणुकीमध्ये होणार का नाही? हे लोकसभा निवडणुकी नंतर स्पष्ट होईल. असं देखील मत देखील राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलं.

VIDEO : मुथूट फायनान्सवर धाडसी दरोडा, तब्बल 10 कोटींचं सोनं लुटलं

First published: February 7, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading