पोलिसाने घरातच केली खुनी थर्ड डिग्री; पत्नी, मुलगा-मुलीला हातोड्याने वार करून संपवलं

पोलिसाने घरातच केली खुनी थर्ड डिग्री; पत्नी, मुलगा-मुलीला हातोड्याने वार करून संपवलं

हत्या करणारा हा कोणताही अट्टल गुन्हेगार नव्हता तर तो एक पोलीस होती. या पोलिसाने आपल्याच हाताने पत्नी, मुलगा आणि मुलीची हातोड्याने वार करून हत्या केली

  • Share this:

रांची, 01 फेब्रुवारी : दारूचं व्यसन एका कुटुंबाच्या जीवावर बेतल्याची अंगावर शहारे आणणारी घटना झारखंडची राजधानी रांचीमध्ये घडली आहे. हत्या करणारा हा कोणताही अट्टल गुन्हेगार नव्हता तर तो एक पोलीस होती. या पोलिसाने आपल्याच हाताने पत्नी, मुलगा आणि मुलीची हातोड्याने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

या पोलीस अधिकाऱ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.  त्याच्यावर उपचार सुरू आहे. ज्यावेळी घरात ही घटना घडली तेव्हा हा पोलीस दारूच्या नशेत होता. ब्रजेश तिवारी(वय 40) असं या पोलिसाचं नाव आहे. ब्रजेश तिवारी हा पोलीस दलातील स्पेशल ब्रांचमध्ये ड्रायव्हरपदावर कार्यरत होता. मूळचा पलामू जिल्ह्यात राहणारा ब्रजेश हा आपल्या कुटुंबासह बडगाई परिसरात चंद्रगुप्तनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ब्रजेश दारू पिऊन घरी पोहोचला होता. घरी आल्यावर पत्नी रिंकी देवी (वय 35) सोबत कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. काही वेळानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. रागाने संतापलेल्या ब्रजेशचं स्वत: वरच नियंत्रण सुटलं आणि त्याने पत्नीवर हातोड्याने हल्ला केला. हातोड्याने पत्नीच्या डोक्यात सपासप वार केले. आईला मारहाण होत असताना पाहून 15 वर्षांची मुलगी खुशबू आणि 10 वर्षांचा मुलगा बादल वडिलांना थांबवण्यासाठी गयावया करू लागले. पण डोक्यात राग संचारलेल्या ब्रजेशला आपली पोटची पोरं सुद्धा दिसली नाही. त्याने या लहान-बहीण भावांवरही हातोड्याने वार केला.  या लहान मुलांवर इतक्या जोरात ब्रजेशने वार केला की, यात खुशबू आणि बादल या लहान चिमुरड्यांचा मृत्यू झाला.

आपल्या हातातून मुलांची आणि पत्नीची हत्या केल्यानंतर ब्रजेश काही वेळानंतर भानावर आला. त्यानंतर पश्चाप झाल्यानंतर रांची इथं राहणाऱ्या बहिणीला फोन करून पत्नी, मुलगा आणि मुलीचा खून झाल्याची माहिती दिली.

पत्नीच्या मृतदेहजवळ राहिला बसून!

भाऊ ब्रजेशने फोनवर सांगितलेल्या घटनेमुळे बहिणीला मोठा धक्का बसला. बहिणीने तातडीने ब्रजेशच्या घराकडे धाव घेतली. मध्यरात्री 12 वाजता ती ब्रजेशच्या घरी पोहोचली तेव्हा तो तिच्या मृतदेहाच्या शेजारीच बसलेला होता.  तर दोन्ही मुलांचे मृतदेह हे जमिनीवर पडलेले होते.

त्यानंतर बहिणीने पोलिसांना फोन करून आपल्या भावाच्या या कृत्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. तसंच आरोपी ब्रजेशला अटक केली. पत्नी आणि मुलांवर हल्ला केल्यानंतर ब्रजेशने जीव देण्याचा प्रयत्न केला होता यात तो जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.

घरमालकाने केला वेगळाच संशय व्यक्त

या घटनेनंतर घरमालक बलदेव साहू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेश आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणाचा आवाज ऐकू आला नाही. जेव्हा घरमालक घरात पोहोचले होते तेव्हा, दारूची बाटली आणि उंदीर मारण्याचं विष खाली पडलेलं होतं. ब्रजेश आणि त्याचं कुटुंब हे गेल्या दोन वर्षांपासून तिथे राहत होतं. बहुतेक ब्रजेशने आधी पत्नी आणि मुलांना विष दिलं असेल. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या पत्नी आणि मुलावर हातोड्याने वार करून खून केला असेल.

First published: February 1, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या