भाजपला 440 व्होल्टचा झटका; TMC विरुद्ध पोटनिवडणुकीत झाला मोठा पराभव!

भाजपला 440 व्होल्टचा झटका; TMC विरुद्ध पोटनिवडणुकीत झाला मोठा पराभव!

भाजपच्या हातात असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर आता त्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.

  • Share this:

कोलकाता, 28 नोव्हेंबर: भाजपच्या हातात असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर आता त्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यावर पकड मजबूत केली आहे. राज्यात विधानसभेच्या झालेल्या 3 जागांवरील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. TMCने भाजप आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शानदार कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर भाजप 2021च्या विधानसभेची तयारी सुरु केली होती. पण पोटनिवडणुकीच्या निकालामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. या पराभवातील गंभीर बाब म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या बालेकिल्ल्यात पक्षाचा पराभव झाला आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांनी मेदिनीपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी खडगपूर येथील आमदारकीचा राजीनामा दिला होता. येथील पोटनिवडणुकीत TMCच्या प्रदीप सरकार यांनी 20 हजार 811 मतांनी विजय मिळवला आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात TMC तिसऱ्या क्रमांकावर होती. तेव्हा घोष यांना काँग्रेसचे उमेदवार ज्ञान सिंग सोहनपाल यांच्यापेक्षा 6 हजार अधिक मते मिळाली होती. आता पोटनिवडणुकीत सरकार यांनी भाजपचे प्रेमचंद्र झा यांचा पराभव केला. तर काँग्रेसचे चितरंजन मंडल तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

कालियागंज विधानसभा पोटनिवडणुकीत TMCच्या तपन देव सिन्हा यांनी भाजपच्या चंद्र सरकार यांचा 2 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार धीताश्री रॉय तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2016च्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसच्या प्रमथ नाथ रे यांनी विजय मिळवला होता. तेव्हा रे यांनी 46 हजार मतांनी विजय मिळवला होता. TMCने करीमपूर पोटनिवडणुकीत देखील विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत TMCच्या बिमलेंदु रॉय सिन्हा यांनी भाजपच्या जयप्रकाश मजूमदार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर भाकपचे गुलाम रब्बी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2016च्या निवडणुकीत TMCच्या महुआ मोइत्रा यांनी भाकपच्या समरेंद्र नाथ घोष यांचा 16 हजार मतांनी पराभव केला होता.

2021साठी महत्त्वाचा निकाल

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीचे निकाल मुख्यमंत्री आणि TMCच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या अखेरच्या पोटनिवडणुका होत्या. लोकसभा निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला होता. तेव्हापासून भाजप विधानसभेची तयारी करत होता. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक भाजप आणि टीएमसी या दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या