मराठी बातम्या /बातम्या /देश /Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताची धक्कादायक अपडेट, 2 नाही तर 3 ट्रेनची धडक, 50 मृत्यू

Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताची धक्कादायक अपडेट, 2 नाही तर 3 ट्रेनची धडक, 50 मृत्यू

कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 50 जणांचा मृत्यू

कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 50 जणांचा मृत्यू

ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 पेक्षा जास्त जण दुखापतग्रस्त झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Odisha (Orissa), India

मुंबई, 2 जून : ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 पेक्षा जास्त जण दुखापतग्रस्त झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकली, यानंतर ट्रेनचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले. दुसऱ्या ट्रॅकवरूनही ट्रेन येत होती, त्यामुळे दोन नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे.

संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली, यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले. यानंतर काहीच वेळात यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून येत होती. या ट्रेनने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर आलेल्या डब्यांना धडक दिली, ज्यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनचे तीन-चार डबे घसरले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जखमींना सोरो सीएचसी, गोपालपुर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (12841)पश्चिम बंगालच्या शालिमार स्टेशनहून चेन्नईसाठी निघाली होती. बालासोरला संध्याकाळी 6.30 वाजता ट्रेन पोहोचली होती. उद्या दुपारी 4.50 मिनिटांनी ट्रेन चेन्नईला पोहोचणार होती. ट्रेनच्या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सर्व आवश्यक व्यवस्था करायला आणि घटनास्थळी पोहोचायला सांगितलं आहे, असं विशेष मदत आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच अधिकच्या मदतीची आवश्यकता असेल तर एसआरसीला सूचित करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. एसआरसीने आपत्कालिन कंट्रोल रूमचा नंबरही जाहीर केला आहे : 0678 2262286

First published: