नवी दिल्ली 08 डिसेंबर : भाजपची अनेक राज्यांमधून सत्ता गेली असली तरी त्यांची जादू अजुनही कायम आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणलं. त्या प्रयोगाची देशात चर्चा झाली. देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतो अशी भावना व्यक्त केली गेली मात्र त्या प्रमाणं प्रयत्न होताना दिसत नाहीत. असं वातावरण असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे आहे मात्र त्यांना पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आलं असंही त्यांनी कबूल केलं. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. शरद पवार म्हणाले, लोकांना आज पर्याय हवा आहे.
मात्र जोपर्यंत पर्याय उभा केला जात नाही तोपर्यत बदल घडणार नाही. मोदींपेक्षा हा नेता उजवा आहे, काहीतरी करून दाखवणारा आहे हे जोपर्यंत ठळकपणे दिसत नाही तोपर्यंत लोक तो पर्याय स्वीकारणार नाहीत. असा पर्याय उभा करण्यात विरोधकांना यश आलं नाही असंही ते म्हणाले. असा पर्याय निर्माण केला तर त्याला पाठिंबा मिळतो हे मी अनुभवलं आहे असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले सर्व पक्ष निवडणुकीनंतर पक्ष एकत्र आले. उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे लोकसभा निवडणुकीत एकत्र आले होते मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजप विरोधाच्या कितीही घोषणा केली तरी हे पक्ष एकत्र येणं शक्य नाही अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे पवारांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.