लंडन,6मार्च- लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती वर्तवण्यात आल्याने येथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हीथ्रो विमानतळ, लंडन शहर विमानतळ आणि वाटरलू रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची माहिती दहशतवादविरोधी पोलीस पथकाला मंगळवारी (6 मार्च) मिळाली. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांचे पथक घटनास्थळावर तपासणीसाठी तातडीने दाखल झाले. येथे पोलिसांना छोट्या बॅगमध्ये काही स्फोटकं सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीथ्रो विमानतळावर तपासणीदरम्यान मिळालेली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एक यंत्र आढळलं, ते उघडताच आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. लंडनमध्ये एकाच दिवशी तीन ठिकाणी स्फोटकं आढळली, या घटनांचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? याचा तपास देखील पोलीस करत आहेत. हीथ्रो विमानतळावरून पोलिसांना बॉम्बसंदर्भातील पहिली सूचना मिळाली. तपासणीदरम्यान पोलिसांनी विमानतळावर सापडलेलं पार्सल उघडताच कमी तीव्रतेची आग लागली. यानंतर वाटरलू रेल्वे स्टेशनच्या पोस्ट रूममध्येही अशाच प्रकारचे पार्सल मिळाले. तिसरी सूचना लंडन शहर विमानतळावरून मिळाली. दरम्यान, या घटनांमुळे विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही. पण शहरापासून सेंट्रल लंडनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा खबरदारी म्हणून काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
Reuters: UK police say counter terrorism investigation launched after small improvised explosive devices found at Heathrow Airport, City Airport and Waterloo station. #London