नवी दिल्ली, ता. 21 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान होणार असलेली भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारताने शुक्रवारी रद्द केली. पाकिस्तानने गुरूवारी दहशतवादी बुऱ्हान वाणीवर पोस्टाचं तिकीट काढलं होतं आणि काश्मीरमध्ये भारताच्या जवानांच्या हत्याही झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक रद्द करण्यात येत असल्याचं परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज स्पष्ट केलं.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी हे न्यूयॉर्कला चर्चेसाठी भेटणार आहेत. दोन परराष्ट्रमंत्र्यांची अशी भेट व्हावी अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती.
त्याला भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या महिन्याच्या शेवटी संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री भेटणार आहेत अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही भेट होत आहे, मात्र ही दोन्ही देशांच्या चर्चेची सुरूवात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी न्युयॉर्क मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असंही खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदींना पाठवलेला हा चर्चेचा पहिलाच प्रस्ताव होता.या पत्राला प्रतिसाद देत भारतानं दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते असं म्हटलं होतं. मात्र ही चर्चा म्हणजे दोन्ही देशांमधली बोलणी सुरू झाली असं नाही असंही भारताने स्पष्ट केलं होतं. मात्र पाकिस्तान काहीही धडा घ्यायला तयार नाही अशी टीकाही रवीश कुमार यांनी केली.
2015 पासून भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही अशी ठाम भूमिका घेत भारतानं चर्चेची दारं बंद केली होती. भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने मध्यस्ती करावी अशी विनंतीही पाकिस्तानने अमेरिकेला केली होती. आजच्या निर्णयामुळं कोंडी कायम राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, India, Narendra modi, Pakistan, Pakistan pm, इम्रान खाननरेंद्र मोदी, पाकिस्तान, भारत