नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटणार नाहीत, भारत भूमिकेवर ठाम

नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटणार नाहीत, भारत भूमिकेवर ठाम

दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही या भूमिकेचाही भारताने पुनरुच्चार केलाय.

  • Share this:

बिश्केक,13 जून : किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक होतेय. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सहभागी झाले आहेत. बैठकीदरम्यान हे नेते भेटणार का? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावर भारताने आता अधिकृत भूमिका स्पष्ट केलीय. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची कुठलीही भेट ठरलेली नाही. मोदी आणि इम्रान खान भेटणार नाहीत असं भारतानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही या भूमिकेचाही भारताने पुनरुच्चार केलाय.

SCOच्या बैठकीची माहिती देण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यात सगळ्यांनाच उत्सुकता होती ती मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीबद्दलची. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. गेली काही वर्ष भारताने दहशतवाद्याच्या मुद्यावरून पाकिस्तानसोबतची चर्चा थांबवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरुपात अधिकृत चर्चा होण्याची शक्यताच नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध जास्तच ताणले गेले आहेत.

शांतता चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे वारंवार विनवण्या करत आहे. मात्र दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं भारताने ठामपणे सांगितलं होतं. दहशतवादाला खतपाणी देण्याचं पाकिस्तानने बंद केलं याची खात्री झाल्यावरच चर्चा पुन्हा सुरू होईल असं भारताने म्हटलं आहे.

मात्र या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे समोरासमोर येऊ शकतात. त्यावेळी अनौपचारिकपणे दोनही नेत्यांमध्ये काही बोलणं होतं या याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोनही नेते समोरासमोर आले तर सौजन्य म्हणून बोलणं होऊ शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

पुतिन यांच्या मोदींना खास शुभेच्छा

पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या व्दिपक्षीय बैठकांनाही सुरुवात झाली. चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्यांनी आपल्या प्रतिनधीमंडळांसोबत चर्चाही केली. या बैठकीत पुतिन यांनी मोदींना ज्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे मोदींनाही आश्चर्याचा धक्का बसला.

पंतप्रधान मोदींना सलग दुसऱ्यांना ऐतिहासिक बहुमत मिळाल्याने जगभरातल्या नेत्यांकडून त्यांचं अभिनंदन होतंय. चर्चेला सुरुवात होताच पुतिन यांनी मोदींचं निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुतिन म्हणाले. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्येही विजयासाठी शुभेच्छा.

पंतप्रधान मोदींनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले आणि मोदी म्हणाले. पुतिन यांनी पुढच्या निवडणुकीतल्या विजयासाठीही मला शुभेच्छा दिल्या.

First published: June 13, 2019, 9:36 PM IST

ताज्या बातम्या